Sangli Samachar

The Janshakti News

वसंतदादांच्या नातवाच्या पाठीशी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा हात !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२४
लोकसभा निवडणूक 2024 साठी सांगलीतून अपक्ष लढत असलेल्या विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून आणखी तीन उमेदवार जाहीर करत, सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंपा देत असल्याची माहिती दिली. वंचितने दिलेल्या पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आता सांगली लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार यात काही शंका नाही.

माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नातू असलेल्या विशाल पाटील यांना गेली दोन ते तीन महिने काँग्रेसकडून तिकिट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र, महाविकास आघाडीत काही अनपेक्षित घडामोडी घडल्यानंतर ही जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला सुटली.


काँग्रेस पक्षाला जागावाटपात ही जागा आपल्याकडे राखता न आल्याने नाराज विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना माजी मंत्री अजित घोरपडे आणि जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच हे दोघेही विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहे. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने सांगलीच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.