Sangli Samachar

The Janshakti News

विश्‍वासार्हता हे वर्तमानपत्राचे खरे भांडवल ः विजय कुवळेकर



| सांगली समाचार वृत्त |
श्रीरामपूर - दि. ९ मे २०२४
जेव्हा लोक तुम्ही लिहिलेले खरे आहे का याची विचारणा करता त्याचा अर्थ तुमच्या विश्‍वासार्हतेबद्दल त्यांच्या मनात शंका आहे असा होतो. त्यामुळे वर्तमानपत्राचे खरे भांडवल हे पैसा नसून विश्‍वासार्हता आहे. ती कष्टाने कमवावी लागते आणि सांभाळावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी केले.

महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारिता गौरव आदर्श साहित्य पत्रकारिता सन्मान पुरस्कार सोहळ्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पोहरे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर जेष्ठ नाटककार सुरेश खरे, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार महेश माळवे यांना स्व.विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. 

कुवळेकर म्हणाले, की राजकारणाशिवाय दुसरे इतर विषय ही महत्वाचे आहेत. प्राधान्य कशाला द्यावे याचे भान अपवाद वगळता काही मालक, संपादक पत्रकार विसरत चालले आहेत. अनेक पत्रकारांना भूगोल, इतिहास, समाजशास्त्र याचे आकलन नाही. भाषा ही संस्कृतीची ओळख असते. जसं आईवर, काळ्या मातीवर आपलं प्रेम असते तसे आपल्या भाषेवर पाहिजे तर तुम्ही भाषा जतन करू शकाल. यासाठी संपादक परिषदेने उपक्रम राबविले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर म्हणाले, की राजकारणाशिवाय देशात कुठल्याही कुठलाही उपक्रम सुरू नाही असे एक चित्रण सध्या डोळ्यासमोर उभे राहते आहे. वास्तविक वस्तुस्थिती अशी नाही. देशामध्ये इतर सर्व उपक्रम आर्थिक घडामोडी, समाजकारण हे उत्तम प्रकारे सुरू आहे. पण त्याचे चित्र, प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटायला पाहिजे ते उमटत नाही. याचं कारण आकलन कमी आहे. राजकारण कुठल्या दिशेला चालले आहे हे समजून घ्यायचे असेल तर अर्थकारण समजून घ्यावेच लागेल. ते घेतले जावे यासाठी माध्यमांमध्ये अर्थकारणाचे आकलन असणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे, ती वाढवायची असेल तर यासाठीचा उपक्रम संपादक परिषदेने हाती घ्यावा. 

प्रास्ताविक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, तर सूत्रसंचालन शिवानी जोशी यांनी केले. यावेळी पत्रकार अनिल पांडे, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ, नितीन शेळके, विकास अंत्रे आदी उपस्थित होते. आभार परिषदेचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ संपादक संजय मलमे यांनी मानले.