Sangli Samachar

The Janshakti News

नागरिकांनो! कोरोना काळात तुम्ही कोविशील्ड लस घेतली असेल तर ही बातमी वाचा..



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ मे २०२४
कोरोनावरील आपल्या 'कोविशील्ड' लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होणे आणि प्लेटलेट्स कमी होणे, यांसारखे काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली ब्रिटिश औषध उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने दिली आहे. रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, प्लेटलेट्स कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका, ब्रेनस्ट्रोकचा धोका निर्माण होऊन प्रसंगी मृत्यूदेखील ओढावू शकतो. त्यामुळे कंपनीच्या या कबुलीमुळे जगभरात खळबळ माजली आहे.

ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशील्ड लसीचे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादन केले आणि भारतातील कोरोना लसीकरण कार्यक्रमात या लसीचा सर्वाधिक वापर करण्यात आला.

ॲस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यामुळे अनेक लोकांना गंभीर आजाराची लागण झाली. तसेच अनेकांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. द डेली टेलिग्राफ या ब्रिटिश दैनिकानुसार ५१ पीडितांनी लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याप्रकरणी कंपनीने दस्तावेज सादर करत आपल्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होणे आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, यांसारखे काही दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली दिली.

वैद्यकीय भाषेत याला थ्रॉम्बोसिस थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) असे म्हणतात. टीटीएसमुळे हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेनस्ट्रोक, फुफ्फुसांचा रक्तप्रवाह बाधित होणे इत्यादी दुष्परिणाम उद्भवू शकतात, असे ॲस्ट्राझेनेकाने न्यायालयात मान्य केले आहे.

हे दुष्परिणाम क्वचित आढळू शकतात. त्यामुळे चिंतेचा कारण नसल्याचेही कंपनीने न्यायालयात सांगितले. चिंतेचे कारण नाही ॲस्ट्राझेनेकाच्या लसीविरोधात जेमी स्कॉट नामक व्यक्तीने सर्वप्रथम तक्रार केली होती. स्कॉटच्या दाव्यानुसार त्याने एप्रिल २०२१ मध्ये या लसीचा डोस घेतला.

मात्र या लसीमुळे आपल्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. याचा परिणाम माझ्या मेंदूवर झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या पत्नीला मी लवकरच मरणार असल्याचेही सांगितले होते.

या लसीचा आपल्याला मोठा शारीरिक व मानसिक त्रास झाला, असा आरोप स्कॉटने केला. दरम्यान, हे दुष्परिणाम क्वचित प्रकरणांमध्ये आढळू शकतात. त्यामुळे चिंतेचा कारण नसल्याचे कंपनीने न्यायालयात सांगितले.

कोविशील्डचे भारतात सर्वाधिक १७५ कोटी डोस

ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशील्ड लसीचे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या औषध उत्पादक कंपनीत उत्पादन करण्यात आले आणि भारतासह जगभरात ही लस पाठवण्यात आली.

उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारी २०२२ पर्यंत या लसीचे १७० हून अधिक देशांमध्ये २५० कोटींहून अधिक डोस देण्यात आले.

भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत २ अब्ज २० कोटी ६८ लाखांहून अधिक डोस देण्यात आले असून त्यामध्ये कोविशील्ड लसीच्या डोसची संख्या १ अब्ज ७४ कोटी ९४ लाख इतकी आहे. म्हणजेच भारतात कोविशील्ड लसीचे सर्वाधिक डोस देण्यात आले आहेत.

'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या व सीरम इन्स्टिट्यूटने ऑफ इंडियाकडून उत्पादित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांत रक्ताच्या गुठळ्या होणे व प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका असतो. त्या आजाराला थ्रोम्बोसिस वुईथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) असे म्हणतात. हे दुष्परिणाम ॲस्ट्राझेनेकानेच लंडन कोर्टात मान्य केले असले तरी

त्यामुळे लोकांनी चिंता करून नये, असे दुष्परिणाम खूपच कमी लोकांवर होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्टे केले आहे.

दुष्परिणाम नेमक्या कशामुळे झाले हे सांगणे कठीण असते, असे जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. ईश्वर म्हणाले.

लसीमुळे अनेक गोष्टींचा धोका होतो कमी

■ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरोनाविषयक कृती दलाचे को- चेअरमन डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना कोरोनाने मृत्यू किंवा बरे झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका, पक्षाघात होण्याचा धोका कमी असतो.

■ लसींचे होणारे फायदे अधिक आहेत. अमेरिकेत लस घेण्यास नकार देणारे वा घेण्यास घाबरलेल्यांपैकी २,३२,००० ते ३,१८,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.