Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत वारं कोणत्या बाजूनं फिरलंय ? तीन पाटलांमधील कोणते पाटील दिल्लीत जातायंत ?



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२४
महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या आणि महाविकास आघाडी तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेल्या सांगलीमध्ये मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. शेजारच्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झालं आहे. सांगली लोकसभेसाठी 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.

सांगली लोकसभेमध्ये मिरज, सांगली, तासगाव कवठेमहांकाळ, जत, खानापूर, पलूस-कडेगाव या सहा विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली. मिरजमध्ये 59 टक्के मतदानाची नोंद झाली. सांगलीमध्ये 57.50 टक्के मतदानाची नोंद झाली. तासगाव कवठेमहांकाळमध्ये 61.16 टक्के मतदानाची नोंद झाली. जतमध्ये 69.32 टक्के मतदानाची नोंद झाली. खानापूरमध्ये 51.11 टक्के मतदानाची नोंद झाली. पलूस कडेगावमध्ये 56.45 टक्के मतदानाची नोंद झाली. साधारणपणे 60 टक्क्यांच्या घरामध्ये सांगली लोकसभेसाठी मतदान झाले. यामध्ये थोडा बदल होऊ शकतो.

सांगलीमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटामधील संबंध विकोपाला गेले. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ठाकरे शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली. त्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.


त्यामुळे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार ? याचे उत्तर चार जून रोजीच मिळणार आहे. दरम्यान सांगलीमध्ये किरकोळ वादाचे प्रकार वगळता शांततेमध्ये मतदान पार पडले. सांगली लोकसभेमध्ये 1 हजार 830 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. संजय पाटील आणि विशाल पाटील यांचे बूथ सर्वत्र दिसून आले. महिला पुरुषांसह तरुण, दिव्यांग मतदारांनी सुद्धा मतदानांमध्ये सहभाग घेत उत्साह वाढवला.

संपूर्ण जिल्ह्याच्या मतांचा आढावा आणि कार्यकर्ते व मतदारांचा कानोसा घेतला असता, अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे पारडे जड असल्याची चर्चा मतदारसंघात होत असून, विशाल पाटील हेच यावेळी लोकसभेत सांगलीचे प्रतिनिधित्व करतील असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.