Sangli Samachar

The Janshakti News

मध्य प्रदेशमध्येही सापडला पैशांचा ढिगारा, नोटांची बंडलं बघून पोलीसही चक्रावले !



| सांगली समाचार वृत्त |
भोपाळ - दि. ११ मे २०२४
झारखंडपाठोपाठ आता मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही एका घरात पैशांचा ढिगारा सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. नोटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलिसांना त्या अजून मोजता देखील आलेल्या नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या पंत नगर कॉलनीत कैलाश खत्री नावाच्या व्यक्तीच्या घरातून मोठ्या रोख स्वरूपात रक्कम जप्त करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीच्या घरातून ही रक्कम सापडली आहे, त्याने एक्स्चेंज व्यवसाय असल्याचा दावा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटा पाच, दहा आणि वीस रुपयांच्या असल्याची माहिती मिळत आहे.

भोपाळ झोन १ च्या डीसीपी प्रियंका शुक्ला यांनी माध्यमांना सांगितलं की, ३८ वर्षीय कैलाश खत्रीच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपातील जप्त करण्यात आली आहे. त्याने मागील १८ वर्षांपासून मनी एक्स्चेंजचं काम करत असल्याचं सांगितलं आहे. त्याने पाच, दहा आणि वीस रुपयांच्या खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात कमिशन घेत आणि ग्राहकांना नवीन नोटा देत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.


पोलिसांनी नवीन आणि खराब झालेल्या नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा मोजण्याचं काम सध्या सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी  दिलेल्या माहितीनुसार अजून त्याच्याकडे कोणतेही संशयास्पद दस्तऐवज सापडले नाहीत. त्याच्यावर अजून कारवाई सुरूच आहे. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आलीय. जर ही रक्कम १० लाखांपेक्षा जास्त असेल, तर दखल घेतली जाईल असं आयकर विभागाने सांगितलं आहे.

यापूर्वी ६ मे रोजी अंमलबजावणी संचालनालयाने झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या एका पीएच्या घरावर छापा टाकून मोठी रक्कम आणि अनधिकृत रक्कम जप्त केली होती. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. देशात लोकसभा निवडणूका पार पडत असताना मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जात आहे.