Sangli Samachar

The Janshakti News

'दिल्ली'तून बांधली जातेय फडणवीस विरोधकांची मोट ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ मे २०२४
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत घडलेल्या राजकीय पक्षांच्या फोडाफोडीमुळे राजकारणाची कूसच बदलली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील 40 आमदार फोडत महायुतीला जवळ केले. तसेच उपमुख्यमंत्रिपदासह महत्वाची खातीही मिळवली. त्यानंतर काँग्रेस फुटली नसली तरी बड्या नेत्यांचं आऊटगोईंग सुरुच आहे.

या सगळ्या फाटाफुटींनंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये बदलाचे वारे वाहू लागले की काय अशी शंका येऊ लागली आहे. पक्षापासून दूर गेलेल्या नेतेमंडळींना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी दिल्लीत मोठी खलबतं सुरू आहेत. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याने फडणवीस विरोधकांची मोट बांधण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावणं सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

तीन वर्षांपूर्वी पक्षावर नाराज होऊन एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली होती. त्याठिकाणी एकनाथ खडसे फारसे रमले नाहीत. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी सुनबाई रक्षा खडसेंना रावेर लोकसभा निवडणुकीसाठी मदत व्हावी या उद्देशाने दिल्लीतील भाजप नेत्यांची भेट घेत भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

मात्र,अद्याप पक्षप्रवेशाचा मुहूर्त रखडलेला असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नसतानाच एकनाथ खडसे भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. यावर भाष्य करताना त्यांनी राज्य भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता थेट राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्याला प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. या त्यांच्या स्पष्टीकरणामुळे दिल्लीत पडद्यामागे बरंच काही शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


शिवसेना पक्ष फोडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागचे मुख्य सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव लपून राहिलेले नाही. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असं ठामपणे सांगितलं जात असतानाच एकनाथ शिंदेंचं नाव समोर आलं. अखेर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली. या निर्णयामागंही दिल्लीतील काही नेते असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर विरोधकांनी यावरुन अनेकदा फडणवीसांना घेरल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचा वाढता दबदबा दिल्लीतल्या काही नेत्यांना रुचत नसल्याचं बोललं जात आहे.


एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधूम सुरू असताना आणि मोदी-शाहांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले असतानाच आता देवेंद्र फडणवीसांविरोधात भाजपमधूनच दुसरी आघाडी उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकनाथ खडसे जर भाजपमध्ये पुन्हा आले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांची मोट बांधतील, अशी शक्यता गृहीत धरून काही जणांकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत असल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे भाजप प्रवेश करणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी नाही-नाही म्हणत 'दिल्ली'वारी करत भाजप प्रवेशावर गेल्या महिन्यातच शिक्कामोर्तब केला आहे.दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीमुळे लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील,अशी शक्यता वर्तवली जात असताना गेल्या महिन्याभरापासून त्यांचा प्रवेश रखडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत राजकारणात एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्य भाजपमध्ये पहिल्या फळीचे नेते असलेले एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर अनेक आरोप केले होते. आता खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 15 दिवसांत भाजप प्रवेश होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राज्यातील नेत्यांना अजून कल्पना नाही.देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले आहे. त्यांनी भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन कोणीही प्रवेश करत असेल तर त्यांना कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवले नाही. अधिकृतरित्या पक्ष आम्हाला ज्या वेळेस कळवेल त्यावेळेस आम्ही त्यांचे स्वागतच करू असेही ते म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे खूप मोठे नेते आहेत. खडसेंचा पक्षप्रवेश माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही. त्यांचा प्रवेश असा खालती होणार नाही, असे खोचक प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला बगल दिली होती.

दुसरीकडे प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा खडसेंच्या प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करीत असले तरी विनोद तावडे दिल्लीत बसून फडणवीस विरोधकांची मोट बांधत असल्याची चर्चा जॊरात आहे. त्यामुळे येत्या काळात जर खडसे भाजपमध्ये आल्यानंतर पुन्हा जर फडणवीस यांच्या विरोधात मोट बांधण्यात प्रयत्नशील असले तर त्याना प्रवेश का द्याचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्यांच्या प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम आहे.

दुसरीकडे दिल्लीत बसून विनोद तावडे फडणवीस विरोधकांना एकत्रित आणत असल्याची चर्चा जोरात आहे. त्यासाठी विनोद तावडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सोबत घेतली असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

विनोद तावडे व फडणवीस यांच्यात पूर्वीपासून फारसे सख्य पाहावयास मिळत नाही,त्यांच्यामुळेच तावडेंना मुंबईस सोडून दिल्लीला जावे लागले होते तर फडणवीस यांनी विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे यांचे विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी कापली होती. त्यामुळे तिघांची फडणवीसबाबत नाराजी आहे. त्यामुळे कदाचित तिघेजण एकत्रित आली असल्याची चर्चा जॊरात आहे. त्यामुळे आता खडसे यांचा येत्या काळात भाजप प्रवेश होणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.