Sangli Samachar

The Janshakti News

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 19 ते 24 मे कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कुठं-कुठं पडणार वादळी पाऊस ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० मे २०२४
आज मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या 11 ते 12 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे देखील वाहत आहेत. या वादळी वाऱ्यांमुळे देखील अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले हे वादळी पावसाचे संकट अखेरकार केव्हा थांबणार? हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. 

पंजाबरावांनी 19 ते 24 मे दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? कोणत्या भागात पाऊस पडणार, कुठे पावसाची उघडीप राहणार? याबाबत सविस्तर अपडेट दिली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 24 मे 2024 या कालावधीमध्ये राज्यातील बहुतांशी भागातील अवकाळी पावसाचे सत्र थांबणार आहे. म्हणजेच राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस थांबणार आहे. मात्र काही ठिकाणी पावसाचे संकट कायम राहणार आहे. या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. 


सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक या भागात 24 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत तुरळक ठिकाणी अगदी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कोकणात देखील हलक्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे. दुसरीकडे 23 मे च्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. हे चक्रीवादळ बांगलादेश कडे रवाना होईल मात्र याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर पाहायला मिळू शकतो. 

या वादळामुळे राज्यातील काही भागांमध्ये 27 मे च्या सुमारास तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. एकंदरीत आता राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र तापमानात वाढ होणार असा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आगामी काही दिवस उष्णतेत वाढ होणार आणि उकाडा अनुभवायला मिळणार असे पंजाबरावांनी म्हटले आहे.