Sangli Samachar

The Janshakti News

'कॅन्सर' हे नाव आलं कुठून? प्राचीन काळात कर्करोगावर कोणते उपचार केले जायचे?| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १३ मे २०२४
कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. हा आजार पूर्णपणे बरा होईल असे काही बोटांवर मोजण्याइतकी प्रकरणे असतात. काही कर्करोगाच्या प्रकारांवर थेरेपीसारखे उपचार प्रभावी ठरत आहेत; तर काही प्रकारांवरील उपायांचा अजूनही शोध घेतला जात आहे. परंतु, कर्करोगाची व्याख्या जरी आपल्याला गेल्या काही वर्षांत कळली असेल तरी हा आजार मात्र खूप जुना आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींविषयी केले गेलेले सर्वांत जुने वर्णन इ.स.पूर्व चौथ्या शतकातील आहे.

इजिप्शियन शहर हेराक्लिया येथील सॅटायरस नावाच्या पुरुषाला मांडीचा भाग आणि अंडकोष यांच्यामध्ये कर्करोग झाला. जसजसा कर्करोग पसरू लागला तसतशा सॅटायरसच्या वेदना वाढू लागल्या. त्या काळात वेदना कमी करण्यासाठी पुरेशी औषधे नव्हती. त्यामुळे वैद्य काहीही करण्यास अकार्यक्षम होते. अखेरीस वयाच्या ६५ व्या वर्षी कर्करोगामुळे सॅटायरसचा मृत्यू झाला. पण, कर्करोग यापूर्वीपासून अस्तित्वात होता. इ.स.पूर्व पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा चौथ्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मजकुरात असे आढळून येते की, याला स्त्रियांचे रोग म्हटले जायचे.


‘कॅन्सर’ हे नाव आलं कुठून?

कॅन्सर (कर्करोग) हा शब्द इसवी सनपूर्व पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि चौथ्या शतकाच्या सुरुवातीला प्रचलित झाला. सुरुवातीला गाठींचे (ट्युमर) वर्णन करण्यासाठी डॉक्टरांनी कार्किनो हा शब्द वापरायला सुरुवात केली. ग्रीक भाषेत खेकड्यांना ‘कार्किनो’, असे म्हटले जाते. त्यानंतर लॅटिन-भाषिक डॉक्टरांनी या रोगाला कॅन्सर म्हणून संबोधले आणि अगदी तेव्हापासून या रोगाला कॅन्सर म्हणून ओळखले जाते.

प्राचीन काळीही लोकांना आश्चर्य वाटायचे की, डॉक्टरांनी या आजाराचे नाव एखाद्या प्राण्यावरून का ठेवले? याचे एक स्पष्टीकरण म्हणजे खेकडा हा एक आक्रमक उभयचर प्राणी आहे, त्याचप्रमाणे कर्करोग हा एक आक्रमक रोग आहे. याचे दुसरे स्पष्टीकरण म्हणजे खेकड्याने एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा एखादा भाग पकडल्यास, तो घट्ट पकडून ठेवतो आणि खेकड्याला वेगळे करणेही कठीण होते. त्याचप्रमाणे कर्करोग एकदा विकसित झाल्यानंतर हा रोग लवकर शरीर सोडत नाही आणि त्यावरील उपायही काही प्रमाणातच प्रभावी असतात.

डॉक्टर गॅलेन (१२९-२१६ इ.स) यांनी त्यांचा ग्रंथ ‘अ मेटॉड ऑफ मेडिसीन टु ग्लौकॉरन’मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वर्णन केले आणि गाठींच्या (ट्युमर) स्वरूपाची तुलना खेकड्याच्या रूपाशी केली आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, स्तनातील गाठी अगदी खेकड्यासारख्या दिसतात. जसे खेकड्याला त्याच्या शरीराच्या सर्व बाजूंनी पाय असतात, तसेच या गाठींच्या आजूबाजूला नसा असतात.

शरीरातील द्रव संतुलित ठेवावे

ग्रीको-रोमन काळात कर्करोगाच्या कारणाबद्दल भिन्न मते होती. एका प्राचीन वैद्यकीय सिद्धांतानुसार, शरीरातील चार द्रव म्हणजेच रक्त, पिवळे पित्त, कफ व काळे पित्त संतुलित स्थितीत नसल्यास माणूस आजारी पडतो. जर एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात काळ्या पित्ताचा त्रास होत असल्यास त्याला कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यावर सुमारे ३१५ ते २४० इ.स. काळातील इरासिस्ट्रॅटसचे वैद्य असहमत होते.

प्राचीन काळातील कर्करोगाचे उपचार

कर्करोगावर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले गेले. प्राथमिक अवस्थेतील कर्करोग औषधोपचाराने बरा होऊ शकतो, असे मानले जायचे. उपचारासाठी वनस्पती (जसे की काकडी, डॅफोडिलचे फूल, एरंडेल बिया, कोबी), प्राणी (खेकड्याची राख) व धातू (आर्सेनिक) यांपासून तयार केल्या जाणार्‍या औषधांचा समावेश होता.

डॉक्टर गॅलेन यांनी असा दावा केला होता की, अशा प्रकारच्या औषधांचा वापर करून अनेकदा त्यांना यश मिळाले. मात्र, ही औषधे काम करीत नसल्यास शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या काळात शस्त्रक्रिया करणे सहसा टाळले जात होते. कारण- रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू व्हायचा. इतर शस्त्रक्रियांच्या तुलनेत स्तनातील कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना यश मिळायचे. इसवी सन दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील डॉक्टर लिओनिडास यांनी शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी व्हावा यासाठी केल्या जाणार्‍या आपल्या उपचारपद्धतीचेही वर्णन केले होते.

त्या काळात कर्करोग हा साधारणपणे असाध्य रोग मानला जात होता आणि त्यामुळे या रोगाची भीती होती. कवी सिलिअस इटालिकस (इ.स. २६-१०२)सारख्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या काही लोकांनी असह्य वेदनेमुळे आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते. बरे होण्यासाठी अनेक रुग्ण देवाला प्रार्थनाही करायचे. याचे उदाहरण म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात कार्थेज (आधुनिक ट्युनिशियामध्ये) येथील इनोसेंटिया या महिलेने तिच्या डॉक्टरांना सांगितले की, देवाने तिचा स्तनाचा कर्करोग बरा केला.

कर्करोगाविरुद्धची लढाई आजही सुरूच…

आपण इ.स.पूर्व चौथ्या शतकातील जुलमी सटायरच्या कर्करोगाविषयी ऐकले. तेव्हापासून २,४०० वर्षांहून अधिक काळ ओलांडून गेला असून, कर्करोग कशामुळे होतो, त्याला कसे टाळायचे आणि त्यावर उपचार काय, याच्या व्याख्या बदलत गेल्या आहेत. आज कर्करोगाचे २०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. काही लोकांच्या कर्करोगावर केले जाणारे उपचार इतके प्रभावी ठरतात की, ते दीर्घ आयुष्य जगतात. परंतु, आजही कर्करोगावर सामान्य उपचार नाही. आज पाचपैकी एकाला कर्करोग होत आहे. २०२२ मध्ये जगभरात सुमारे २० दशलक्ष नवीन कर्करोगाची प्रकरणे समोर आली; तर ९.७ दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला.