Sangli Samachar

The Janshakti News

जिंकल्यावर शरद पवारांचे उमेदवार मोदींसोबत जाणार| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. १० मे २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे विरोधात बोलण्याचा ते केवळ दिखावा करतात. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे उमेदवार निवडून आले, तर ते मोदींसोबत जाणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी प्रचारसभेतून केला. 

बीडमध्ये वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले, संरक्षण मंत्री राजनाथसिंह महाराष्ट्रात प्रचारासाठी आले असता, पवार यांचे त्यांच्यासोबत बोलणे झाले. लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची चर्चा झाली का, याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. फसवणूक होऊ नये यासाठी मतदारांनी पवार यांचा उमेदवार बजरंग सोनवणे यांना मतदान करताना विचार करावा. मराठा आरक्षणासाठी अण्णा पाटील, त्यानंतर शशिकांत पवार, त्यानंतर छावा संघटना, जिजाऊ संघटनेने आंदोलन केले. पण, पवार यांनीच सर्व आंदोलने उधळून लावली. शरद पवारांनी पुरोगामी चळवळी संपवल्या, असा आरोप त्यांनी केला. 

देशाचे संविधान बदलण्याची हिंमत कुणातच नाही. मात्र, सत्ताधारी सध्या जनतेत भीती निर्माण करीत आहे. अशा लोकांच्या हाती पुन्हा सत्ता जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.