Sangli Samachar

The Janshakti News

महापूरप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात ७ जूनला बैठक !



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २८ मे २०२४
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापूरप्रश्नी दि. ७ जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. महापूर नियंत्रण समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी सोमवारी ही माहिती दिली.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला सातत्याने महापुराचा फटका बसत आहे. प्रशासन महापूर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बैठक घेण्याचे अश्वासन जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्याचे समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.


यावर्षी सरासरी पेक्षा १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्याला महापुराचा धोका आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे, असे सांगत दिवाण म्हणाले, कर्नाटक सरकारची पाणी अडवण्याबाबतची भूमिका नेहमी आडमुठी आहे. वडनेरे समितीने कर्नाटक सरकार महापूरला अलमट्टी जबाबदार नसल्याचे भाष्य केले होते; मात्र आम्ही सातत्याने महापुराच्या कारणांचा वास्तववादी शोध घेतला.

आलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१७ मीटरवर ठेवण्याची भाषा केली जात आहे. कर्नाटकची ही बदललेली भूमिका म्हणजे आम्ही सातत्याने आवाज उठवण्यात झालेला बदल आहे; मात्र कर्नाटकच्या शब्दावर विश्वास न ठेवता केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा पालन करण्यावर जिल्हा प्रशासनाने ठाम राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कृती समितीचे प्रदीप वायचळ, संजय कोरे, सुयोग हावळ उपस्थित होते.