Sangli Samachar

The Janshakti News

महायुतीत पुढील मुख्यमंत्री कोण असेल ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई दि. १८ मे २०२४
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना दुसरीकडे राज्याला विधानसभा निवडणुकीचेही वेध लागले आहेत. ४ जून रोजी केंद्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लागलीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या निमित्ताने राज्यात नवं समीकरण पाहायला मिळेल की जुनंच सरकार सत्तेवर बसेल, यावर चर्चा रंगल्या आहेत. तसंच, नव्या पर्वाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ते लोकसत्ताने आयोजित केलेल्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलत होते.

“गेल्या वेळी राज्यात भाजपा-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यंदा महायुती तेवढ्या जागा निश्चित जिंकेल”, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. “भाजपाला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यावर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडले जाईल, अशी उगाचच चर्चा केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य मित्रपक्ष महायुती म्हणूनच एकत्रित लढू अशी ग्वाही देतो. भाजपाच्या शत-प्रतिशत नाऱ्याचे काय झाले या प्रश्नावर, जेव्हा केव्हा आम्हाला ५१ टक्के मते मिळण्याची खात्री होईल तेव्हाच आम्ही तसा विचार करू. ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


जागावाटपात लोकसभेची भरपाई विधानसभेच्या वेळी केली जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जागा सोडताना अडचणी येतील, याची त्यांना कल्पना देण्यात आली होती. विधानसभेच्या वेळीही जागावाटपात मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. मात्र ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असे सूत्र असेलच, हे सांगता येणार नाही. आताही भाजपाचे ११५ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंनी १५१ जागांचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं

"२०१४ ला शिवसेनेला १४७ जागा देऊन आम्ही १२७ जागा लढण्यास तयार होतो. पण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी १५१ जागा लढविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेने युती तोडली. त्यातून आम्हाला आमची राज्यातील ताकद समजली. मलाही त्याचा व्यक्तिगत फायदा झाला व मी मुख्यमंत्री होऊ शकलो", असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

शिवसेनेच्या हट्टापायीच मला मुख्यमंत्रीपद मिळालं

"जास्त जागा लढल्याने भाजपाचे अधिक उमेदवार निवडून आले होते. जर शिवसेनेबरोबर आम्ही लढलो असतो, तर भाजपाला कमी जागा मिळाल्याने त्यांच्यापेक्षा आमचे कमी उमेदवार निवडून आले असते आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला असता. शिवसेनेच्या हट्टापायी मला मुख्यमंत्रीपद मिळाले. खरे तर मी त्यांचे आभारच मानतो", असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.