Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रात जिथे महायुती धोक्यात तिथेच मतदानाचा टक्का वाढला!| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ मे २०२४
महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी सहा वाजता जाहीर केलेली आकडेवारी आणि अंतिम आकडेवारीत मोठी तफावत दिसून येते. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 7.52 टक्के आणि यवतमाळमध्ये 5.87 टक्के वाढ झाली आहे. महायुतीच्या धोक्यात आलेल्या दोन मतदारसंघांतील टक्केवारीत नेमकी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अकरा दिवसांनंतर आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी चार दिवसांनी जाहीर केली. यातील आकडेवारीत तफावत आढळून आली आहे.

राज्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. मतदान झाल्यावर निवडणूक आयोगाच्या वतीने संध्याकाळी सहा वाजता प्रत्येक मतदारसंघातील अंदाजित आकडेवारी जाहीर केली जाते. पण दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी जाहीर होते. त्यात चंद्रपूर मतदारसंघातील संध्याकाळची सहाची आकडेवारी आणि नंतर जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत तब्बल 7.52 टक्के वाढ झाली आहे तर यवतमाळमध्ये 7.87 टक्के मतदानात वाढ झाली आहे, तर इतर मतदारसंघांत फक्त दोन ते तीन टक्के सरासरी वाढ झाल्याचे दिसून येते. दरम्यान, मतदान केंद्रावर सहापूर्वी प्रवेश केल्यास कितीही विलंब झाला तरी मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर रात्री दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. निवडणूक आयोगातर्फे संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची अंदाजित आकडेवारी जाहीर केली जाते. मग दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी जाहीर होते. त्यामुळे आकडेवारीत तफावत दिसून येते असा दावा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला.


केंद्राचा दबाव तर टक्का वाढला नाही ना?

लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्पात मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या टक्केवारीत तब्बल 11 दिवासांनी वाढ करण्यात आली. आयोगाकडून ही चूक झाली की केंद्र सरकारच्या दबावाखाली मतदानाचा टक्का वाढला तर नाही ना, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. डिजिटल भारतात निवडणूक आयोगाकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते, असा प्रश्न अनिल देशमुख यांनी केला आहे.

चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले. नेमक्या याच मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळ- वाशीममध्ये शिंदे गटाच्या भावना गवळी यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना ऐनवेळी तिकीट दिल्याने ही सीट धोक्यात आहे. येथे मतदानाच्या टक्केवारीत 5.87 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.

पहिल्या टप्प्यात अंदाजे 60.22 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने मतदाना दिवशी सांगितले. मात्र 10 दिवसानंतर अंतिम आकडेवारी जाहीर केली तेव्हा हा आकडा 63. 71 टक्के इतका सांगितला गेला.

दुसऱ्या टप्प्यात अंदाजे 59. 63 टक्के मतदान झाल्याचे मतदाना दिवशी सांगितले गेले. मात्र 10 दिवसांनंतर अंतिम आकडेवारी जाहीर केली तेव्हा हा आकडा 62.71 टक्के झाला.

मतदानावर शंका आहेच – शरद पवार

मतदानाची टक्केवारी उशिरा जाहीर केली त्यावर आमची तक्रार आहेच. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान घ्यायची गरज काय होती? चंद्रपूर आणि नागपूरपेक्षा गडचिरोलीला जास्त मतदान हे शंका घेण्यासारखं आहे. नागपूरमध्ये कमी मतदान ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.