Sangli Samachar

The Janshakti News

जितेंद्र आव्हाडांनी डाॅ. आंबेडकरांचा फोटो फाडला; माफीही मागितली - तरीही संतापाची लाट !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० मे २०२४
मनुस्मृती दहन करण्याकरिता महाड येथे पोहोचलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मनुस्मृती लिहिलेले पुस्तक फाडत असताना, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठली. या प्रकरणी राज्यभरातील नेत्यांनी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील सर्वांची माफी मागितली आहे.

या संदर्भात आव्हाड म्हणाले की, मनुस्मृतीचे दहन करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले आहे. या मागे आमचा कोणताही दुसरा हेतू नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दाम केलेले नाही. या संदर्भात विरोधकांना राजकारण करायचे असल्याने ते अनेक मागण्या करतील. मात्र, मी त्यावर काहीही बोलणार नाही. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिले आहे. आव्हाड पुढे म्हणाले, मी आजपर्यंत कधीही माफी मागितलेली नाही. मात्र, या वेळी माफी मागतोय, यावरुन ते माझ्या मनाला किती लागले हे लक्ष्यात आले असेल. त्यामुळे, महाराष्ट्राच्या जनतेने मला माफ करावे, असेही आव्हाड म्हणाले.


मिटकरींनी दिला होता गंभीर इशारा

या प्रकरणी अमोल मिटकरी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. या मध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘जाहीर निषेध! जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये? आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील.’

काय आहे मनुस्मृती श्लोक प्रकरण ? 

भारताच्या प्राचीन साहित्य, संस्कृती व ज्ञान परंपरेची विद्यार्थांना माहिती व्हावी या उद्देशाने व नवीन शैक्षणिक धोरणातील निर्देशानुसार शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश करण्याचा प्रस्ताव एससीईआरटी ने मांडला आहे. पण त्याला विरोध होत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याला विरोध केला आहे. या श्लोकाच्या समावेशाविरोधात तब्बल 1500 आक्षेप सूचना सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, शरद पवार, वर्षा गायकवड, रामदास आठवले, छगन भुजबळ, अजित पवार, यांसही अनेक नेत्यांनी या श्लोकाच्या समावेशाला विरोध केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही विरोध केला असून त्याच पार्श्वभूमीवर विरोधासाठी आंदोलदरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोडो फाडल्याची घटना घडली आहे.