| सांगली समाचार वृत्त |
आग्रा - दि. १५ मे २०२४
कुरकुरे जीभेला चव आणतात; पण इथं कुरकुऱ्यांमुळं संसारात मिठाचा खडा पडलाय. कुरकुरे खाण्याची बायकोची इच्छा झाली. तिनं नवऱ्याला कुरकुरे आणायला सांगितले. पण तो बिच्चारा विसरला आणि तिथंच तो फसला.बायको रुसली आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन बसली. हे कुरकुरे प्रकरण आता पार घटस्फोटापर्यंत गेलंय.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही अजब-गजब घटना घडली आहे. कुरकुरे आणले नाहीत म्हणून एका महिलेला आपल्या नवऱ्यापासून वेगळं व्हायचं आहे. तिनं नवऱ्याकडे घटस्फोट मागितला.
महिलेला कुरकुरे भलतेच आवडायचे. कुरकुरे खाल्ले नाहीत तर ती पार अस्वस्थ होऊन जायची इतकी आहारी गेली होती. नवरा तिला रोज कुरकुरे खाण्यासाठी ५ रुपये द्यायचा. एक दिवस तिनं नवऱ्याला कुरकुरे आणायला सांगितले. पण तो घरी येताना कुरकुरे घेऊन आला नाही. तिला राग आला. रुसून बसली. तिनं थेट घरच सोडलं आणि आपल्या माहेरी जाऊन राहिली. त्यानंतर ती पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांसमोरच तिनं घडलेला प्रकार सांगितला आणि नवऱ्यापासून वेगळं राहायचं असल्याचं म्हणाली.
यानंतर शाहगंज पोलिसांनी या जोडप्याला समुपदेशनासाठी नेलं आहे. मागील वर्षीच्या सुरुवातीलाच या दोघांचं लग्न झालं होतं. सुरुवातीला त्यांचा संसार अगदी राजाराणीसारखा चालला होता. काही महिने उलटून गेल्यानंतर त्यांच्यात बिनसलं.
संसाराचा गाडा हाकताना खटके उडू लागले. बायकोला लागलेली कुरकुरे खाण्याची सवय त्याला पचली नाही. महिलेची मात्र वेगळीच तक्रार आहे. नवऱ्याने मारहाण केल्याने मी माहेरी आले, असं तिनं पोलिसांना सांगितलं.