Sangli Samachar

The Janshakti News

महात्मा गांधी-बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवांमध्ये जुंपली...| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ मे २०२४
राज्यातील राजकारणात वेगवेगळे वाद यला मिळत आहेत. नेहमीच कोणी ना कोणी तरी विवादास्पद वक्तव्य करून वादाला स्थान करत आहेत. पण आता पुन्हा एकदा आंबेडकर वि. गांधी या असा नवा वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पूर्वीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर वंचित बहुजन आघाडीने 'छुपा रुस्तम' म्हणून काम केले आहे, असा टोला तुषार गांधी यांनी लगावला आहे. गांधींच्या या टीकेला आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले तुषार गांधी ?

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना तुषार गांधी म्हणाले की, पूर्वीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर वंचित बहुजन आघाडीने 'छुपा रुस्तम' म्हणून काम केले आहे. मतांचे गणित बिघडवण्यासाठीच त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने त्यांना पर्याय दिला होता. ते इंडिया आघाडीत येऊ शकले असते. त्यांनी व्यावहारिक मागणी केली असती, तर इंडिया आघाडीनेही त्यांना घेतले असते. पण ते ठरवूनच आले होते. त्यांना जबाबदारी दिली होती. आणि त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले, अशी टीका गांधी यांनी केली. तसेच, एखाद्या जागेवर तुम्हाला मते किती मिळतात आणि तुम्ही किती नुकसान करता, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत घेताना वंचित बहुजन आघाडीवर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांची जी क्षमता होती, त्यानुसार त्यांना जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असेही तुषार गांधी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. 


आता तुषार गांधी यांच्या या टीकेला वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तुषार गांधींनी वंचित बहुजन आघाडीचे केलेले विश्लेषण आम्ही ऐकले आहे. त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. त्यांच्या पणजोबांसारख्याच त्यांच्याही जातीय भावना आहेत. महात्मा गांधींना वंचित वर्गासाठी (आताच्या अनुसूचित जातीसाठी) स्वतंत्र मतदार नको होते. आता त्यांचे पणतू तुषार गांधी यांनाही वंचित आणि बहुजनांच्या पक्षाने निवडणूक लढवावी आणि त्यांच्या जवळही स्वतंत्र राजकीय विचार आणि नेतृत्व असावे, असे वाटत नाहीये. महात्मा गांधींना याचा नक्कीच अभिमान वाटत असेल की, त्यांचा पणतू त्यांच्या सडलेल्या जातीयवादी विचारसरणीचा आणि अनुसूचित जातींबद्दलच्या वृत्तीचा वारसा पुढे नेत आहे, असा टोला वंचितकडून लगावण्यात आला आहे.