Sangli Samachar

The Janshakti News

कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ मे २०२४
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मनसेनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे."

अभिजीत पानसेंना कोकण पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर, पण मनसेची की, महायुतीची ?

कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच जागेवर मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.


अभिजीत पानसे कोण ?

मनसे नेते अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये पानसेंनी दिग्दर्शित केलेल्या रेगे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी बाळासाहेबांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी संजय राऊतांनी अभिजीत पानसेंची निवड केली. अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमा महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रचंड गाजला. शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेची धुरा अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर होती. मात्र, नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी बाळासाहेबांकडून युवासेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं. मग नाराज पानसे यांनी मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला. अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अभिजीत पानसे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली होती.