Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवारांच्या 'त्या' विधानाने राजकीय चर्चांना उधाण!| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ मे २०२४
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला लागणार आहेत. निवडणुकीमध्ये एनडीए 400 पार जाईल, असा दावा भाजपकडून केला जात आहे. तर या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असा दावा इंडिया आघाडीचे नेते करत आहेत. यातच आता अजित पवारांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. 10 जूनला दिल्लीत वेगळं घडलं तर राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुढे जाण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. त्यामुळे अजित पवार बहुमताबाबत साशंक आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.

येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आपण 25 वं वर्ष साजरा करणार आहोत, राष्ट्रीय अधिवेशन हे मुंबईत घ्यावं की दिल्लीत, यावर लवकर निर्णय घेवू असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपने सहाव्या टप्प्याच्या निवडणुकीनंतरच 300 जागांचा टप्पा पार केल्याचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निकालाची माहिती ब्रह्मदेवाला नसल्याचंही सांगितलं. तर दुसरे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. विरोधकांनी भाजपच्या बहुमताच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. जनतेच्या डोळ्यात भाजप हद्दपार दिसत होतं, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची परस्परविरोधी दावे पाहता 4 जूनला निकाल लागल्याशिवाय कोण खरं, कोण खोटं हे ठरवता येणं अवघड आहे. मात्र तोपर्यंत दावे आणि प्रतिदावे सुरूच राहणार आहेत.