Sangli Samachar

The Janshakti News

बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास !| सांगली समाचार वृत्त |
डेहराडून - दि. १९ मे २०२४
उत्तराखंडच्या पिथौरागढच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पतंजलीच्या सोन पापडीचा गुणवत्ता चाचणीत अयशस्वी झाल्यामुळे शिक्षा सुनावली आहे. 

न्यायालयाने या प्रकरणात पतंजलीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांना दोषी ठरवले आणि प्रत्येकी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय या प्रकरणात दंडही ठोठावण्यात आला आहे. पैसे न भरल्यास शिक्षेचा कालावधी वाढवला जाणार असल्याचे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. सोनपापडी चाचणीचे हे प्रकरण 2019 चे आहे. 17 ऑक्टोबर 2019 रोजी, पिथौरागढच्या बेरीनागच्या मुख्य बाजारपेठेत लीला धर पाठक यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा निरीक्षकांनी नमुने घेतले होते. तपासणीत त्यात अनियमितता आढळून आली. राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मिठाईचा दर्जा निकृष्ट होता. यानंतर दुकाणदार लीला धर पाठक, वितरक अजय जोशी आणि पतंजलीचे सहायक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.


सुनावणीनंतर न्यायालयाने या तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या कलम 59 अन्वये अनुक्रमे 5 हजार, 10 हजार आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत आपला निर्णय जाहीर केला. "न्यायालयात सादर केलेले पुरावे उत्पादनाच्या निकृष्ट दर्जाचे स्पष्टपणे निर्देश करतात," असे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.