Sangli Samachar

The Janshakti News

विद्यार्थी, नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स वाढविण्यास प्रयत्न व्हावेत - अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ मे २०२४
विद्यार्थी व नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स वाढावा म्हणून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी राज्यस्तरीय आरएसपी शिक्षक अधिकारी प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यक्त केले.

रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत व वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांची माहिती देऊन त्यांच्यात वाहतुकीची शिस्त निर्माण होण्यासाठी व त्याबाबत त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी ट्रॅफिक सेन्स वाढावा म्हणून आर एस पी ही योजना राज्यातील सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळेत पोलीस व शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे प्रमुख महासमादेशक अनिल शेजाळे, पुणे जिल्हा समादेशक विजय भस्मे, ड्रिल इन्स्ट्रक्टर अशोक कोळी व आरएसपी अधिकारी उपस्थित होते.


श्रीमती खोखर यांनी सांगितले, विद्यार्थी, नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स वाढविण्यास अशा प्रशिक्षणाची व्याप्ती वाढणे गरजेचे आहे. रस्त्यावर जाताना घ्यावयाची काळजी जसे की, सीट बेल्ट, हेल्मेट तसेच वाहतुकीचे नियम सर्वांनी प्रखरतेने पाळावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच दोन चाकी, चार चाकी वाहनांची कागदपत्रे जवळ ठेवण्याचे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महासमादेशक अनिल शेजाळे यांनी आरएसपीची आवश्यकता व गरज विशद केली. माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांत हा विषय अनिवार्य व्हावा तसेच यास सवलतीचे गुण मिळावे. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा होत असून, यासाठी राज्यातील आठही सर्व परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी विशेष आदेश काढून प्रोत्साहित केले आहे. यासाठी सर्वांनी अधिकाधिक प्रचार व प्रसार, प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

या प्रशिक्षणात १३ जिल्ह्यातील १५० शिक्षक सहभागी झाले असून हे निवासी राज्यस्तरीय आरएसपी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण सांगली पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री. ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल, सांगली येथे दिनांक १० मे ते १९ मे २०२४ या कालावधीत होत आहे.