Sangli Samachar

The Janshakti News

जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' - नरेंद्र मोदी| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. १ मे २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा मुस्लिम आरक्षणावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना ओबीसीमधून किंवा एससी, एसटीमधून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तेलंगणा येथील जहीराबाद येथे आयोजित जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, वोट बँकेसाठी काँग्रेस संविधानाचा अवमान करत आहे. परंतु मी त्यांना एक सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना इतरांचं आरक्षण मिळू देणार नाही.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीदेखील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांवर गंभीर आरोप केले होते. कर्नाटकमध्ये मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केल्याने पंतप्रधान प्रत्येक सभेत काँग्रेसचा समाचार घेत आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले, एक वेळ होती जेव्हा जगभरातील देश विकासाच्या मार्गावर पुढे जात होते, परंतु काँग्रेसच्या काळात भारत विकासाच्या बाबतीत मागे होता. एनडीएने मोठ्या कठीण प्रसंगातून देशाला बाहेर काढलं. परंतु काँग्रेस पुन्हा देशाला जुन्या वाईट दिवसांकडे घेऊन जाऊ इच्छित आहे.

मोदी पुढे म्हणाले, हैदराबादमध्ये रामनवमीची शोभायात्रा काढण्यास मज्जाव केला जातोय. कारण त्यामुळे काँग्रेसची वोट बँक नाराज होऊ नये. केंद्रात सत्ता आल्यानंतर काँग्रेस वारशाने मिळालेल्या मालमत्तेवर ५५ टक्के कर लावणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा पराभूत करा, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.