Sangli Samachar

The Janshakti News

जुन्या गोष्टी काढल्या तर संजय राऊतांना पार्श्वभागाला.; मनसेचे जोरदार प्रत्युत्तर !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ मे २०२४
ठाकरे हे सुपारीबाज आहेत, अशी पहिली गर्जना भाजपाने केली होती, आम्ही नाही. राज ठाकरे सुपारी घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात हे आम्ही कधीच म्हणालो नाही. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो. सुपारी घेऊनच ते प्रचार करतात हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे. फडणवीसांना विस्मरणाचा झटका आला नसेल तर ते सांगतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हटले होते. यानंतर आता मनसेने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊतांवर निशाणा साधताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊतांच्या जुन्या गोष्टी काढल्या तर त्यांना पळताभूई थोडी होईल. जुन्या गोष्टी काढल्या तर संजय राऊतांना पार्श्वभागाला पाय लावून पळायला लागेल अशी त्यांची परिस्थिती होईल. सुपारी जर गळ्यात अडकली तर गिळताही येणार नाही आणि बाहेरही काढता येणार नाही. त्यामुळे सांभाळून बोला, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

जुन्या गोष्टी सगळ्यांच्याच काढल्या तर कुणालाच तोंड दाखवायची जागा उरणार नाही. ज्या दिवसापासून आम्ही महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे, तेव्हापासून उबाठाच्या तंबूत भीती पसरली आहे. त्यामुळे जुने काहीतरी काढण्याचं सुरू आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होते राहतात, पण ज्यापद्धतीने सत्तेसाठी संजय राऊत इथून तिथून उड्या मारतात. शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसतात त्याला सुपारी घेणे म्हणतात. राऊतांना उबाठा संपवण्याची सुपारी शरद पवारांनीच दिली आहे आणि ते काम संजय राऊत व्यवस्थितपणे करत आहेत, असा गंभीर आरोप करतानाच संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.


संदीप देशपांडे म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांना कुणाचा शेवट जवळ आलाय हे सांगण्याची त्यांची लायकी नाही. कारण राज ठाकरे संपवणारे संपले आहेत, हे जितेंद्र आव्हाडांनी लक्षात ठेवावे. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी स्वत: महायुतीच्या प्रचारात उतरलो आहोत. त्यामुळे उबाठा गटात भीती आहे. त्यांच्या आरेला कारे करणारे हे महाराष्ट्र सैनिकच आहेत, पण यांची चिल्लीपिल्ली माहिती आहे. आज गुजरातींबाबत बोलतात. जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, केम छो वरली हे बोर्ड कुणी लावले? असा सवाल करत मराठीवरील यांचे प्रेम बेगडी आहे. जेव्हा मतदान हवे असते तेव्हाच या लोकांना मराठी माणूस आठवतो. 25 वर्ष महापालिकेत असताना मराठी माणसांसाठी काय केले? जे मराठी माणसं मुंबईत राहत होते. त्यांना कल्याण डोंबिवली, वसई विरार, नवी मुंबईत पाठवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला.

शिवतीर्थावर मोदी-राज ठाकरेंची सभा

दरम्यान, राज ठाकरेंच्या पुढील सभेबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, शिवतीर्थाने आजवर अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या आहेत. आचार्य अत्रेपासून बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांची सभा पाहिली आहे. त्यात इतिहासाच्या पठडीतील अजून एक सभा येत्या 17 तारखेला शिवतीर्थावर पंतप्रधाना नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची होईल, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.