Sangli Samachar

The Janshakti News

धर्मेंद्र यांनी बायकोसाठी बुक केलं होतं १०० खोल्यांचं अख्ख रुग्णालय !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ मे २०२४
बॉलिवूडचे हीमॅन अर्थात धर्मेंद्र हे फक्त सिनेमांसाठीच नाही तर त्यांच्या लव्हलाईफमुळेही चर्चेत राहिले आहेत. त्यांनी दोन लग्न केली आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे, तर त्यांची दुसरी पत्नी 'ड्रीम गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा हेमा मालिनी यांच्यासाठी 100 खोल्या असलेले संपूर्ण हॉस्पिटल बुक केले होते. पण असं पाऊल उचलण्याचं कारण खूप खास होतं.

धर्मेंद्र यांनी प्रकाशकौरसोबत पहिलं लग्न झालेलं असतांनाही त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. विरोध झुगारुन त्यांनी १९८० साली हेमा यांच्याशी लग्न केलं होतं. जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या बाळाचा जन्म होणार होता, तेव्हा संपुर्ण रुग्णालय बुक करण्यात आलं होतं. पत्नी आणि होणाऱ्या बाळाच्या सुरक्षेसाठी 100 रूम असलेलं संपूर्ण रुग्णालय बुक करण्यात आलं होतं. १९८१ साली त्यांचं पहिले बाळ अर्थात अभिनेत्री ईशा देओलचा जन्म झाला. सध्या हेमा मालिनी यांचा एका शोमधील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ईशा देओल आणि हेमा मालिनी दिसून येत आहेत. या टॉक शोमध्ये हेमा यांच्या जवळची मैत्रिण नीतू कोहली यांनी सांगितलं की, 'जेव्हा ईशाचा जन्म होणार होता, तेव्हा हेमा गरोदर आहे, हे कोणालाच माहीत नव्हतं, म्हणून धरमजींनी ईशासाठी संपूर्ण हॉस्पिटल बुक केलं होतं. ते जवळपास १०० खोल्या असणारे एक नर्सिंग होम होतं'. शोमध्ये उपस्थित असलेली ईशा देओल हे ऐकून हसते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान नुकतेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या जोडीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघांच्याही गळ्यात हार दिसून येत आहेत. विशेष म्हणजे इतकी वर्ष एकमेकांची साथ दिल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.