Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत मतदान यंत्रांच्या स्ट्राँगरूमवर टॉवरवरून नजर, कडेकोट पोलीस बंदोबस्त !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान झाले. आता उमेदवारांचे भवितव्य कैद असलेली मतदान यंत्रे मिरजेतील शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरूमला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांसह राज्य आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकडय़ाही तैनात आहेत. गोदामाच्या चारही बाजूला टॉवरवरून नजर ठेवली जात आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सांगलीत जिह्यात चुरशीने 62.27 टक्के मतदान झाले. भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील, अपक्ष उमेदवार विशाल पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत झाली. सात मे रोजी रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन मिरजेतील शासकीय गोदामातील स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांच्या उपस्थितीत सील करण्यात आली. येत्या 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी हे मशीन प्रशासनाच्या ताब्यात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टरसह पोलिसांचा बंदोबस्त आहे. अगदी शेवटच्या ठिकाणी ही यंत्र ठेवण्यात आली आहेत. त्याठिकाणी चारही बाजूने बंदिस्त करण्यात आले आहे. जिथे मतपेटय़ा सील करून ठेवल्या आहे, त्या स्ट्राँगरूमची सुरक्षा अत्यंत चोख आहे. स्ट्राँगरूमच्या एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे येणारा प्रत्येक व्यक्ती कॅमेऱयात चित्रित होऊन त्याचे रेकॉर्ड राहते.


स्ट्राँगरूमच्या बाजूच्या परिसरात राज्य आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात आहेत. त्याच बाजूला नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. चारही बाजूचे सीसीटीव्ही नियंत्रण येथून होते. चोवीस तास डोळ्यात तेल घालून पहारा दिला जातोय. वरिष्ठ अधिकाऱयांशिवाय त्या परिसरात कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. एकूणच ही सारी यंत्रणा कडेकोट बंदोबस्तात आहे.

सांगली जिल्हा प्रशासनाकडून पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महसूल कर्मचाऱयांसाठी खास व्यवस्था केली आहे. उन्हासाठी कुलरसह फॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. याच परिसरात भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱयांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. काही विशिष्ट वेळेत वर्ग एकचे अधिकारी या परिसरात भेट देतात. सुरक्षा दलांना दिलेल्या लॉग बुकमध्ये त्याच्या भेटीचा वेळ, कालावधीसह उल्लेखही केला जातो.

मतपेटय़ा ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमसह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांचा चोवीस तास याठिकाणी पहारा ठेवण्यात आला आहे.