Sangli Samachar

The Janshakti News

विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ मे २०२४
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झालाय... दोन्हीकडून इच्छुकांनी दावे ठोकल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. मविआतील पक्षांना विचारात न घेताच उद्धव ठाकरेंनी मुंबई शिक्षक आणि पदवीधरचे उमेदवार जाहीर केल्याची टीका होतेय.

उद्धव ठाकरेंनी मुंबई पदवीधरमधून अनिल परब आणि मुंबई शिक्षकमधून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. प्रकाश सोनावणे इच्छुक आहेत. मविआचा मित्रपक्ष समाजवादी गणराज्य पक्षही मुंबई शिक्षक मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहे. सुभाष मोरे हे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाचे उमेदवार असतील.


काँग्रेस आणि शरद पवार गट उद्धव ठाकरेंवर नाराज 

विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून मविआतही बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय. ठाकरे गटाने मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मविआतील मित्र पक्षांची कोणतीही संयुक्त बैठक झालेली नसताना उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसेनं भिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीतही तिढा 

दुसरीकडे महायुतीमध्येही काही वेगळी परिस्थिती नाहीय. महायुतीत मुंबई पदवीधरची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचं सांगत डॉ.दीपक सावंत यांनी दावा केलाय. तर भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही आहे. महायुतीमध्ये नव्यानेच सामील झालेल्या मनसेनंही कोकण पदवीधरमधून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीतही तिढा निर्माण झालाय. भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे.

लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून घटक पक्षांशी चर्चा न करताच मुंबई शिक्षक आणि पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जून रोजी निवडणूक होणार आहे...मुंबई पदवीधरसाठी अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी ज.मो.अभ्यंकर यांचे नाव उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलंय...तर शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनावणे इच्छुक आहेत. महायुती असो वा मविआ.. दोन्हींकडेही मित्रपक्षांची संख्या वाढलेली आहे.. त्यामुळे साहजिकच इच्छुकांची संख्याही मोठी आहे.. लोकसभेलाही इच्छुकांची मनधरणी करताना दोन्हींकडच्या नेतृत्वाच्या नाकीनऊ आले होते. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीतही तोच कित्ता पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.