Sangli Samachar

The Janshakti News

"आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे" - संजय विभुते



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीत वादाची ठरलेल्या सांगलीच्या जागेवरून अजूनही वाद संपलेला नाहीय. यातच अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने ठाकरे गटाने यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस गद्दार आहे. असा घणाघात आता ठाकरे गटाचे सांगली जिल्ह्याध्यक्ष संजय विभुते यांनी केला आहे.


काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी, काँग्रेसने विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस ही विशाल पाटील यांच्या पाठीशी होती. सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीने काँग्रेसने हकालपट्टी करावी, अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ शिवसेनेने घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपलं पाहिजे. परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे. असंही त्यांनी म्हटले आहे.