Sangli Samachar

The Janshakti News

सांगली रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर पुन्हा फुली, प्रशासनाबद्दल नाराजी !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ मे २०२४
विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी सांगलीचे रेल्वे स्थानक अधोगतीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल बनविण्याचे आश्वासन देऊनही मध्य रेल्वेने पुन्हा सांगलीच्या पादचारी पुलाची अर्धी दाढी करण्यातच धन्यता मानली आहे. प्लॅटफाॅर्म क्र. ४ व ५ साठी तांत्रिक कारण देत पादचारी पुलाच्या कामावर फुली मारण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त केला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले प्रवासी प्लॅटफॉर्म ४ व ५ अद्याप प्रवासी गाड्यांसाठी वापरण्यात येत नाही. पुणे-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होऊनही सांगली स्टेशनवर क्राॅसिंगची कसरत करावी लागते, तसेच सांगली स्थानकावर पादचारी पूल नसल्याचे कारण देऊन नवीन गाड्या सुरू करण्यास रेड सिग्नल देण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा खेळही दुसऱ्या बाजूला सुरू आहे.


सांगली स्थानकावर प्लॅटफार्म एक, दोन व तीनवरील पादचारी पुलाचे काम मार्चमध्ये चालू झाले; पण चार व पाचवर पादचारी पुलाचे काम तांत्रिक कारण देत बंद ठेवले आहे. नवे प्लॅटफाॅर्म उभे राहून पाच महिने उलटले तरी अद्याप त्याठिकाणी पादचारी पूल उभारला नाही. प्लॅटफॉर्म पाचवर पादचारी पूल नसल्यामुळे दिल्ली, राजस्थान, गुजरात, ऋषिकेश, हरिद्वार, पटना, प्रयागराज, पुणे, मुंबई येथून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना विनाकारण क्रॉसिंगची कसरत करत प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा दोनवर आणावे लागत आहे.

क्रॉसिंगचा जीवघेणा खेळ

पादचारी पूल नसल्यामुळे सांगलीत प्रवासी तसेच माल धक्क्यावर काम करणाऱ्या कामगार व हमालांच्या जिवाला मोठा धोका आहे. त्यांना रोज रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो.