Sangli Samachar

The Janshakti News

कोल्हापूर येथील बांगलादेशी घुसखोरी महिलांकडे सांगलीचे कनेक्शन !



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. १९ मे २०२४
बांगला देशातून घुसखोरी करून कोल्हापुरात नागदेववाडी येथे राहिलेल्या दोन महिलांकडून सांगली येथून काढलेले रेशन कार्ड आणि पॅनकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. घुसखोरी करणाऱ्या या महिला पाच वर्षांपूर्वीपासून सांगलीत व डिसेंबरपासून कोल्हापुरात राहिल्‍याचे स्पष्ट झाले आहे. दोघींपैकी एका महिलेवर सांगलीत एक कारवाई झाल्याची माहिती आज करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. दरम्यान, आज अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी करवीर पोलिस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती घेतली.

सुमन राधेश्याम वशिष्ठ ऊर्फ हमिदा बेगम (वय ३८, सध्या रा. साई मंदिर परिसर, नागदेववाडी कॉलनी नागदेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मूळ रा. सोनार गाव, जिल्हा नारायण गंज, बांगलादेश) आणि खुशी शहाबुद्दीन भुया शेख (वय २५, सध्या रा. साई मंदिर परिसर, नागदेववाडी कॉलनी, नागदेववाडी. ता. करवीर, मूळ सोनारगाव, जि. नारायण गंज बांगलादेश) अशी त्यांची नावे आहेत. या‍या दोघी मुळच्या बांगलादेशी आहेत. त्यांच्याकडे पासपोर्ट-व्हिसा काहीही नसताना त्या कोल्हापुरातील नागदेववाडी येथे भाड्याने राहत असल्याचे दिसून आले. 


याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली. त्यांनी स्वतः त्यांच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास सुरू केला, तेंव्हा त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा मिळून आला नाही. त्यांच्याकडे तो नसल्याचीही त्यांनी कबुली दिली आहे. त्या घुसखोरी करून देशात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्‍विनी वायचळ यांनी तपास सुरू केला आहे. अधिक चौकशी केल्यानंतर त्या १८ डिसेंबर २०२३ पासून नागदेव कॉलनी राहत असल्याचे तपासात पुढे आले. यामध्ये एका महिलेने तिचे नाव बदलल्याचेही दिसून आल्याचेही तपास अधिकारी वायचळ यांनी सांगितले.

आधारकार्डवरील छायाचित्रात बदल केल्याचा संशय

दोन्ही महिलांकडे असलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एका महिलेकडील डायरीही पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये पहिल्या पानावर बदामाचे चित्र काढल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर काही माहिती त्यांनी बंगाली भाषेत लिहिली आहे. काही पाने कोरी सोडल्याचेही दिसून आले. त्यांच्याकडील आधारकार्ड २०१९ मध्ये तयार केले असून ते एप्रिल २०२४ मध्ये अपडेट केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावरील छायाचित्रात बदल केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

पोलिस महासंचालकांकडून दखल

पोलिस महासंचालकांकडून या गुन्ह्याची दखल घेतली आहे. त्यांच्या मुंबईतील कार्यालयातून या तपासाबाबत पाठपुरावा सुरू झाला आहे. परदेशी नागरिक विनापरवाना घुसखोरी करून कोल्हापुरात कशा पोचल्या, त्यांना येथपर्यंत कोणी आणले? त्यांच्यासोबत आणखी किती महिला देशात आल्या आहेत, त्या केंव्हापासून देशात आहेत? त्यांना देशात विनापासपोर्ट पाठविणारी कोणती साखळी आहे काय, याची माहिती घेतली जात आहे.

काय काम करतात याची माहिती लपवली

घुसखोरी केलेल्या दोन्ही महिला नागदेवावाडीत भाड्याच्या खोलीत घरात आहेत. त्यांनी रितसर अकरा महिन्यांचा भाड्याचा करार घर मालकाशी केला आहे. मात्र त्यामध्ये त्यांनी काय काम करतात याची माहिती लपवलेली आहे. मुळात महिला बांगलादेशी असल्याची माहिती दिलेली नाही. तसेच सांगलीतून घेतलेले आधारकार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून घर भाड्याने मिळविले असल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.