Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभा निवडणूक संपताच सर्व करार मोडीत निघण्याची चिन्हं, मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप-अजितदादा गट भिडणार ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ मे २०२४
मुंबई शिक्षक मतदार संघावरून आता महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये राष्ट्रवादीने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. तर भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असून भाजपाकडून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजप व राष्ट्रवादीमध्ये शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीवरून खडाजंगी होऊ शकते.

मुंबई शिक्षक मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मुंबई शिक्षक मतदारसंघात 18 वर्षे भाजपच्या पाठिंब्याने संजीवनी रायकर यांनी प्रतिनिधित्व करुन शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. मधल्या काही काळाचा अपवाद वगळता आम्हीदेखील तेवढ्याच प्रमाणात, मीदेखील मुंबईतील शाळेत शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि ते कसे सोडवावेत, हे मला माहिती आहे. गेल्या 25 वर्षांपासून एकही दिवस असा नाही की, मी अविरत भाजपचा कार्यकर्ता म्हणून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. माझा मुंबईतील अनेक शिक्षकांशी चांगला संपर्क आहे. मी शेकडो आंदोलनं केलेली आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवताना मी अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून या मतदारसंघाची बांधणी आणि नोंदणी आणि माझा प्रचार सुरु आहे. मी जवळपास 70 टक्के शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मला मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. मला विश्वास आहे की, भाजप मला शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेवर पाठवेल, असे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

राज ठाकरेही भाजपला झटका देणार 

राज्यात मुंबई शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षण मतदारसंघ या चार ठिकाणी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी परस्पर अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. येथून निरंजन डावखरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, राज ठाकरे यांनी अगोदरच अभिजीत पानसे यांना उमेदवारी घोषित करुन भाजपची गोची केली आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे भाजपची साथ सोडणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.