Sangli Samachar

The Janshakti News

ये पब्लिक है... सब जानती है |



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ११ मे २०२४
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी आणि राजकीय पक्षाच्या प्रचाराची रणधुमाळी यातून या देशात पुन्हा कुणाचे सरकार येणार, याचे आकलन सर्वसामान्यांना झाले असणार, यात संदेह नाही. राज्यात झालेल्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाच्या आकडेवारीवरून चर्चा होत असली, तरी एकंदरीतच जनतेचा जो गेल्या दहा वर्षांतील केंद्रातील सरकारच्या कामगिरीबाबत विश्वास निश्चित झाला आहे, त्याचे प्रतिबिंब ४ जूनच्या निकालात उमटले, तर नवल वाटायला नको.

आता राहिला प्रश्न तो विखारी आणि दुष्प्रचाराचा, तर राज्यातील केवळ दोन नेतेच असा दुष्पप्रचार प्रामुख्याने करीत असून, त्याला किती नागरिक बळी पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, आपल्या राज्याची राजकीय सभ्य संस्कृती आणि त्याला साजेसे वर्तन किंवा भाष्य करायचे सोडून, काही नेते अक्षरशः पिसाळल्यागत बोलू लागल्याने आणि ती भाषा आजकालच्या प्रसारमाध्यमांच्या तेजीच्या काळात सर्वत्र 'व्हायरल' होऊ लागल्याने खरोखरच आपल्या राज्यातील राजकीय नेते इतके खालच्या स्तराला जाऊन राजकारण करण्यास बाध्य झालेत, हे दिसून येईल. यात एकतर त्यांचा हा अहंकार आहे किंवा त्यांचा स्वार्थ त्यांना डिवचतो आहे. कारण, ते जे काही देशातील आणि राज्यातील राज्य कारभाराबाबत ओरडून सांगताहेत, त्यांत काहीही तथ्य नाही, हे आम जनतेला पूर्णतः ठाऊक तर आहेच; मात्र सत्तेत असणारी व्यक्तीदेखील तशा वृत्तीची नसल्याने आणि चक्क सर्वत्र प्रगती आणि विकास काही प्रमाणात कमी-अधिक होत असल्याने या विरोधकांच्या तथ्यहीन आराोपांवर आणि खोटे बोलण्यावर आपोआपच शिक्कामोर्तब होत आहे.


विशेष म्हणजे, ते ज्या भ्रमात आहेत की, जनता आपल्या आरोपांना खरे मानून आपल्यावरच विश्वास ठेवत आहे, हे देखील हास्यास्पद आहे. कारण, एका वयाची ८० पार केलेल्या अनुभवी नेत्याने 'आम्ही ३०-३५ जागा जिंकू' हे केलेले विधान त्यांच्या केविलवाण्या अवस्थेची साक्ष देणारे आहे. अडीच वर्षे सत्तेत लाडीलबाडीने येऊन खोटेनाटे धंदे करून, आपल्या विश्वासू व्यक्ती असलेल्या गृहमंत्र्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप होऊनदेखील छातीठोकपणे मस्त प्रतिमेचा आव आणणार्‍या व्यक्तीला जनता मत देत असेल, तर यावर विश्वास तरी कुणी ठेवायचा आणि का ठेवायचा?

...सब जानती हैं |

आगामी काळात आता दोन टप्प्यात महाराष्ट्रातील जवळपास २५ लोकसभा मतदारसंघांंत निवडणूक होत आहे. पहिल्या तीन टप्प्यात विदर्भ, मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणचा काही भाग असलेल्या मतदारसंघात मतदान झाले आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक म्हणूनच बघितली जात आहे. त्यामुळे एकूणच सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची दहा वर्षांची कामगिरी त्यांनी आपल्या देशाची निर्माण केलेली जगातील उजळ प्रतिमा आणि एकूणच होत असलेली विकासकामे अशा आशयाने या निवडणुकीकडे लोक बघत आहेत. अर्थात, निवडणुकीत प्रतिस्पर्धी असावा लागतो, त्यामुळे विरोधी पक्ष ज्या काही वल्गना करीत आहेत आणि देशातील जनतेसाठी काय केले जाईल, याबाबत आश्वस्त करीत आहेत, हे सर्व चित्र बघितले तरी आगामी चित्र काय असेल, याचे भविष्य सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना आपल्या देशाविषयी निर्माण झालेली आस्था, देशातील सत्तेतील लोक करीत असलेला कारभार आणि त्यातून त्यांना मिळणारे समाधान यामुळे जनतेला कधीही अराजक किंवा हुकूमशाही अशा वातावरणाबाबत अनुभव आलेला नाही. त्यामुळे आपल्या देशाची प्रगती निरंतर व्हावी, देशातील जनतेला प्रगतीतून सुविधा मिळाव्यात त्यांचादेखील या देशाच्या विकासात हातभार लागावा, अशा तर्‍हेचा आत्मविश्वास निर्माण झाल्यानेच एकूण आगामी टप्प्यातील निवडणुकीचा कल कसा असेल, हे सांगायला नको. अर्थात, त्यासाठी जनता आधीच्या काँग्रेस नेतृत्वातील सरकारच्या भ्रष्ट कारभाराला विसरली नसेल, हे देखील गृहीत धरण्याची आवश्यकता नाही. कारण, खुद्द त्यांच्या काही नेत्यांचे वक्तव्यच अलीकडील काळात अशी येऊ लागली आहेत की, जनता पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा वाईट अनुभव घ्यायला तयार होईल, अशीदेखील आता शाश्वती वाटत नाही. त्यामुळे जनतेला पारदर्शक कार्य हवे, जे गेल्या दशकात त्यांनी अनुभवले. यापेक्षा वेगळे काय सांगायला हवे? दुदैव हे आहे की, गेल्या दशकात जो कारभार जनतेने बघितला, ज्या सुविधा घरापर्यंत मिळाल्या, जनतेची जी स्वप्न साकार होत आली, त्यावर प्रकाशझोत टाकण्याऐवजी किंवा त्यावर चर्चा करण्याऐवजी विरोधक जनतेला उल्लू बनवू पाहत आहेत, हेच खरे !