Sangli Samachar

The Janshakti News

प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावर पोहोचताच बेड्या, कर्नाटक पोलिसांची कारवाई !| सांगली समाचार वृत्त |
बेंगळुरू - दि. ३१ मे २०२४
जेडीएसमधून निलंबित करण्यात आलेला हसन लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि महिला अत्याचार प्रकरणात फरार असलेला प्रज्वल रेवण्णा अखेर जर्मनीतून भारतात दाखल झाला. कर्नाटक पोलिसांनी बंगळुरु विमानतळावर पोहोचताच प्रज्वल रेवण्णाला अटक केली. बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल रेवण्णा पोहोचताच त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली . 

कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला इंटरपोलनं गुरुवारी प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्यासंदर्भात माहिती दिली होती. यानंतर बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेसाठी पूर्वतयारी करुन ठरली होती. बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीनं प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच अटकेची कारवाई केली. आता प्रज्वल रेवण्णा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत आहे. 

प्रज्वल रेवण्णानं 27 एप्रिला देश सोडून पलायन केलं होतं. हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो फरार झाला होता. इंटरपोलनं बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीला प्रज्वल रेवण्णा जर्मनीतून म्युनिक विमातळावरुन निघाल्याची माहिती दिली होती. बंगळुरु पोलिसांच्या विनंतीवरुन इंटरपोलनं प्रज्वल रेवण्णाला ब्लू कॉर्नर नोटीस देखील काढण्यात आली होती. 


कर्नाटक पोलिसांना इंटरपोलचं सहकार्य

शुक्रवारी म्हणजेच 31 मे रोजी मध्यरात्री 12.49 वाजता प्रज्वल रेवण्णाचं विमान बंगळुरु विमानतळावर दाखल झालं. जर्मनीतून ते विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी 3.35 वाजता निघालं होतं. यासंदर्भात इंटरपोलनं कर्नाटक पोलिसांना माहिती दिली होती. 

प्रज्वल रेवण्णानं एसआयटी चौकशीसाठी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं होतं. बुधवारी प्रज्वल रेवण्णानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर बंदोबस्त वाढवला होता. 

कर्नाटक सरकारनं प्रज्वल रेवण्णा भारत सोडून फरार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी एसआयटीची स्थापना केली होती. महिला अत्याचाराचे प्रज्वल रेवण्णाचे व्हिडीओ सार्वजनिक झाले होते. प्रज्वल रेवण्णा विरोधात महिला अत्याचाराच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

तीन पीडितांनी प्रज्वल रेवण्णा विरुद्ध बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या असून त्याचे प्राथमिक पुरावे प्राप्त झाल्यानंतर एसआयटीनं आणखी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून ठिकाणांची पडताळणी केली जात आहे. एसआयटीकडून फोन लोकेशनची माहिती घेत तांत्रिक डेटाच्या आधारे तपास केला जात आहे. 

एसआयटीकडून प्रज्वल रेवण्णाची डीएनए टेस्ट, आवाजाची चाचणी केली जाणार आहे. 

दरम्यान, प्रज्वल रेवण्णा कर्नाटकडून फरार झाल्यानंतर विरोधकांनी भाजप आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरुन भाजप आणि जेडीएसला प्रश्न विचारले होते.