Sangli Samachar

The Janshakti News

मिरज, नौपाडा येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; साडे सतरा लाखाचे दागिने जप्त| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२४
मिरजेतील टाकळी रस्त्यावरील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अमित राकेश पंचम (वय ३०, रा. वानलेसवाडी, मूळ रा. राबोडी, शिवाजीनगर, ठाणे) याला अटक केली. त्याच्याकडून १७ लाख ६५ हजार रूपयाचे दागिने जप्त केली. हा चोरीचा मुद्देमाल मिरज आणि नौपाडा (जि. ठाणे) येथील घरफोडीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले आहे. या पथकातील कर्मचारी सोमनाथ गुंडे यांना दि. २१ रोजी संशयित अमित पंचम हा मिरज ते अर्जुनवाड रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली चोरीतील दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पुलाच्या परिसरात सापळा रचला. पुलाखाली संशयास्पद थांबलेल्या पंचम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता सोन्याचे ब्रेसलेट, अंगठ्या, कर्णफुले, सोनसाखळी, नेकलेस, मोहनमाळ, वेढण असे २९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले. तसेच चार हजाराचे चांदीचे दागिने मिळाले. १७ लाख ६५ हजार रूपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.


चोरीच्या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने मिरज शहरात दोन ठिकाणी व नौपाडा येथे घरफोडी केली असून त्यातील दागिने असल्याची कबुली दिली. पोलिसांनी मिरज शहर व नौपाडा येथे खात्री केल्यानंतर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. मिरजेत टाकळी रस्त्यावरील सिद्धिविनायक कॉलनीतील शैलेश चौगुले यांचे घर ७ एप्रिल रोजी रात्रीनंतर फोडले होते. मिरजेतील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पंचम याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक निरीक्षक वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी अमोल लोहार, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, सुनिल जाधव, अजय बेंदरे, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.