| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
भारत देश हा विविधतेने नटलेला असल्यामुळे परदेशीयांना कायम आपल्या देशाचे आकर्षण वाटते. आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू, खाद्य संस्कृती, दळणवळणाची साधने अशा बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी हे लोक भारतात येत असतात. आपल्याकडे अनेक भागांमध्ये वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहनांचा वापर केला जातो. जसे की, लोकल ट्रेन, बस, मेट्रो, मोनो, टॅक्सी. ही सर्व वाहने परदेशात देखील आहेत. मात्र, भारतातील सर्वात लोकप्रिय वाहन असणारी तीनचाकी रिक्षा परदेशात पहायला मिळत नाही. पण आता, चक्क अमेरिकेत रिक्षा पहायला मिळतेय. होय. तसा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमेरिकेतील अत्यंत प्रसिद्ध शहर कॅलिफोर्नियामध्ये चक्क ऑटोरिक्षाचे दर्शन झाले आहे. कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर एक ऑटोरिक्षा मोठ्या थाटात आणि सगळ्यांचे लक्ष वेधत फिरताना दिसतेय. सोशल मीडियावर या रिक्षाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर फिरणारं काळ्या आणि पिवळ्या रंगातील हे वाहन आपली लाडकी रिक्षा आहे, हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर स्वच्छ रस्ते आणि त्यावरून ऐटीत जाणारी रिक्षा खरोखरच कमाल वाटतेय.
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ manoharsrawat नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कॅलिफोर्नियात ऑटोरिक्षा #artesia.' व्हिडिओत दिसणारी रिक्षा अगदी भारतातील रस्त्यांवर फिरणाऱ्या रिक्षांसारखी आहे. त्यामुळे खरोखरच हे दृश्य भारतीयांसाठी विशेष ठरत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजपर्यंत परदेशात केवळ भारतीय संस्कृती, इतिहास आणि खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रकर्षाने पाहिले होते. मात्र, आता रिक्षाबाबत असलेलं आकर्षण पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका नेटकऱ्याने म्हटलंय, 'वाह! मुंबईची रिक्षा थेट अमेरिकेला पोचली..'. तर आणखी एकाने म्हटलंय, 'वाह! आता अमेरिका भारतासारखी बनू लागली आहे'. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलंय, 'या रिक्षाला परवानगी कशी मिळाली?' दरम्यान कमेंट बॉक्स पाहून लक्षात येते की, कॅलिफोर्नियात रिक्षा पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. हा व्हिडीओ ट्रेंडिंग व्हिडिओंपैकी एक असून आतापर्यंत याला ९८३K इतके व्ह्युज आणि २६.५K लाइक्स मिळाले आहेत.

