Sangli Samachar

The Janshakti News

चहाचा कप फेकून मारल्याच्या रागातून डफळापूर येथील दांपत्याचा खून !



| सांगली समाचार वृत्त |
डफळापूर - दि. १६ मे २०२४
डफळापूर (ता. जत) येथील राजकारणात सक्रिय असणारे एक कुटुंब. त्यांच्याकडे शेतमजूर होता. तो घरचीही कामे करायचा. जानेवारी २०१५ मध्ये त्या शेतमजुराने मालकाला चहा करून दिला. त्या वेळी किरकोळ कारणातून मालकाने तोच कप शेतमजुराला फेकून मारला आणि त्याला राग अनावर झाला. त्याच्या मनात राग धुमसत होता. दोन-अडीच तास विचार केल्यानंतर तो बंगल्याशेजारील खोलीतून बाहेर पडला. 

बंगल्याच्या सेंट्रल लॉकला किल्ली तशीच असल्याने दरवाजा उघडून आत आला. त्यानंतर त्याने कोणताच विचार न करता धारदार शस्त्राने मालक आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने तेथेच दारू पिऊन जेवण केले. त्यानंतर त्याने मोटार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मोटार चालवावयास येत नसल्याने तो दुचाकीवरून कर्नाटकात पळून गेला. 


दरम्यान, डफळापूर येथे दुहेरी खुनामुळे खळबळ उडाली. तत्कालीन पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे राजकीय पार्श्‍वभूमी तपासण्यात आली. जतचे तत्कालीन निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक तपास करत होते. दुसऱ्या बाजूला गुंडाविरोधी पथकाचे तत्कालीन निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या पथकालाही तपासाचे आदेश दिले. मग, घरातील कामगारांवर संशयाची सुई आली. गुंडाविरोधी पथकातील सहायक निरीक्षक जितेंद्र शहाणे, साईनाथ ठाकूर, सागर लवटे, योगेंद्र खाराडे, सुनील भिसे, महेश आवळे यांचे पथक रवाना झाले. खबऱ्यामार्फत आणि तांत्रिक तपासाद्वारे त्याचा पत्ता मिळाला. कर्नाटकात सापळा रचला. 

त्या वेळी एक-दोन नव्हे, तर चार तास पोलिस दबा धरून बसले होते. अखेर योग्य वेळ आल्यानंतर संशयिताला पाठलाग करत ताब्यात घेतले. त्या वेळी कोणी ओळखू नये म्हणून त्याने दाढी केली होती. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. कप फेकून मारल्याच्या रागातूनच खून केल्याचे त्याने कबूल केले. तसेच खुनानंतर दोन तास तो तेथेच असल्याचेही त्याने कबूल केले. यासाठी नार्को चाचणीही पहिल्यांदा करण्यात आली होती. तत्कालीन निरीक्षक पिंगळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने जन्मठेपे सुनावली. तत्कालीन पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पथकाला २५ हजारांचे पारितोषिकही दिले.