Sangli Samachar

The Janshakti News

पुणे आयुक्तांच्या अडचणी काही संपेनात; आयुक्तालयात सापडल्या दारूच्या बाटल्या ?| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २९ मे २०२४
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका धनिकपुत्राने आलिशान पोर्शे कारने दोन तरुणांना उडवले. यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पुणे पोलिसांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार ताजा असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलीस ऑन ड्युटी ड्रिंक करुन काम करतात की काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. या गंभीर प्रकारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोलीस आयुक्तलयाच्या आवारात गुन्हे शाखेची इमारत आहे. याच इमारतीच्या काही अंतरावर आणि पाठीमागे मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. पोलीस आयुक्तालयात सर्वसामान्यांना यायचे असेल तर गेटवर त्यांची संपूर्ण चौकशी केली जाते. त्यांचे नाव, ओळखपत्र, काय काम आहे, कोणाला भेटायचे आहे, अशी सर्व चौकशी करुन नागरिकांना आत सोडले जाते. सहजासहजी सामान्य नागरिकांना आयुक्तालयात येणं शक्य नाही. तसेच जर एखादा व्यक्ती गाडी घेऊन आला तर पोलिसांकडून त्या गाडीची तपासणी केली जाते. एवढी सुरक्षा घेतली जात असताना पोलीस आयुक्तालयात दारुच्या बाटल्या आणल्या कोणी? एकीकडे पुण्यात ड्रँक अँड ड्राईव्हचा प्रकार घडला असताना आयुक्तालयात ऑन ड्युटी ड्रिंक असा काही प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.