Sangli Samachar

The Janshakti News

मतदान केंद्रावर मोहन आगाशे यांनी राजकारण्यांना चांगलंच सुनावलं !| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १३ मे २०२४
आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड येथे मतदान होत आहे. अशातच अनेक जण मतदानाचा हक्क बजावत आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मतदान केंद्रावर त्यांनी राजकारण्यांना चांगलंच सुनावलं आहे.

काय म्हणाले मोहन आगाशे ?

मोहन आगाशे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान केंद्रावर माध्यमांशी बोलताना सांगितलं, "35 उमेदवार उभा आहेत पाच मिनिटं मशीन वाचण्यातच गेली. माणसागणिक पार्ट्या झाल्या आहेत. मतदानाबाबत जनजागृती केली पाहिजे. लोकांनी काय केलं पाहिजे, हे मी सांगू शकत नाही. पण निदान प्रत्येकानं आपलं काम चोख पद्धतीनं कारवं, तरच आपला देश सुधारेल." मोहन आगाशे यांच्या या वक्तव्यानं लक्ष वेधले आहे. 


मोहन आगाशे यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. जैत रे जैत, देऊळ, कासव, अस्तू या त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.   राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (13 मे) सात वाजल्यापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले आहे.

कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

मोहन आगाशे यांच्यासोबतच अभिनेता सुबोध भावे, अमोल पालेकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. सुबोध भावेनं गुजराती शाळेत मतदानाचा हक्क बजावला.