Sangli Samachar

The Janshakti News

पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेल्या काँग्रेसच्या मेळाव्याला मदन पाटील गट अनुपस्थित राहिल्यामुळे प्रश्नचिन्ह ?



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारी आल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काय होईल ते दि. ४ जूनला स्पष्ट होईल. पण, तोपर्यंत काँग्रेस पक्षासाठी तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विधानसभेचे इच्छुक कामाला लागले आहेत. त्यातूनच सांगलीत सोमवारी सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा झाला. या मेळाव्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याची जागा उद्धवसेनेला गेली. उद्धवसेनेकडून चंद्रहार पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण, राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्ह्यात आघाडीची बिघाडी झाली होती. महाविकास आघाडीकडून उमेदवारी डावलल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. उमेदवारी नाकारल्याच्या राजकारणामुळे विशाल पाटील यांच्या बाजूने पोषक वातावरण झाले. ग्रामीण भागातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रथमच जोश दिसून आला. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांचा जोश आणि वसंतदादाप्रेमींची मोठी साथ विशाल पाटील यांना मिळाली. त्यामुळे तिरंगी असणारी लढत अपक्ष विशाल पाटील विरुद्ध भाजपचे खासदार संजय पाटील अशी झाली. या दुरंगी लढतीत कोण सांगलीचा खासदार होणार हे ४ जूनला ठरणार आहे.


पण, त्यापूर्वी सांगली लोकसभा निवडणूक क्षेत्रात काँग्रेससाठी पोषक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विधानसभेचे इच्छुक मैदानात उतरले आहेत. सोमवारी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीत सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा घेतला. या कार्यकर्त्यांना स्नेहभोजनही यानिमित्ताने दिले. या स्नेहमेळाव्यास काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या स्नेहमेळाव्यास सांगली विधानसभेच्या इच्छुक जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी जाण्याचे टाळल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली होती.

मदनभाऊ पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ

पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहभोजन मेळावा सांगलीत आयोजित केला होता. या मेळाव्यास मदनभाऊ पाटील युवा मंच आणि मदनभाऊ गटाच्या कार्यकर्त्यांनी जाणे टाळल्याची चर्चा सांगलीत मंगळवारी रंगली होती. मदनभाऊ पाटील युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही आमच्या गटाचे कार्यकर्ते गेले नव्हते, असे स्पष्ट सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये गटातटाच्या राजकारणाला सुरुवात झाली की काय, अशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका व्यक्त केली.