Sangli Samachar

The Janshakti News

शेतकऱ्यांच लक्ष लागलेल्या भेंडवळच भाकीत आलं समोर, यंदा पीक पाणी, पावसाचा अंदाज काय?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
एप्रिल-मे मध्ये उन्हाने अंगाची काहिली होत असताना सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना प्रतिक्षा असते ती पावसाची. यंदाच्यावर्षी किती पाऊस पडणार? याकडे शेतकऱ्यांसह सगळ्यांचच लक्ष असतं. कारण त्यावरुन पीक पाण्याचा अंदाज बांधता येतो. यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस किती पडणार? याचा दरवर्षी हवामान विभागाकडून एक अंदाज वर्तवला जातो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष असतच. पण त्याशिवायही पावसाचा अंदाज वर्तवण्याच्या काही पद्धती आहेत. यात एक प्रमुख आहे, भेंडवळची घट मांडणी. बुलढाण्यात दरवर्षी पावसाळा सुरु होण्याआधी भेंडवळची घट मांडणी केली जाते. या भेंडवळच्या घट मांडणीतून काय भाकीत वर्तवलं जातं, याकडे शेतकऱ्यांच बारीक लक्ष असतं.

भेंडवळच्या घट मांडणीतून पाऊस, पीक पाण्यासह राजकीय, आर्थिक भाकीत सुद्धा वर्तवली जातात. घट मांडणीच्या निरीक्षणावरुन ही भाकीतं केली जातात. यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी करण्यात आली. पुंजाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेंडवळच्या घट मांडणीच निरीक्षण केलं. घट मांडणीच्या अंदाजानुसार, पहिल्या महिन्यात कमी पाऊस असेल. दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण म्हणजे पहिल्या महिन्यापेक्षा जास्त पाऊस असेल. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडेल असा भेंडवळच भाकीत आहे. अवकाळी पाऊस सुद्धा यंदा भरपूर असेल असा भेंडवळचा अंदाज आहे.


भेंडवळ घट मांडणीतून कसं वर्तवतात भाकीत ?

भेंडवळ घट मांडणीची परंपरा मागच्या 300 वर्षांपासून सुरु आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी केली जाते. त्यात 18 प्रकारचे धान्य आणि गोल खड्डा करून त्यात मटकी ठेवली जाते. रात्री ज्या हालचाली होतील, त्याचे निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवलं जातं.