Sangli Samachar

The Janshakti News

बैलगाडा शर्यती संदर्भात नवीन नियमावली जाहीर !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० मे २०२४
सध्या राज्यात सगळीकडे गावच्या यात्रांचे दिवस सुरु आहेत. जेव्हापासून बैलगाडा शर्यतींना सरकारची परवानगी मिळाली तेव्हापासून यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतींनी मैदाने रंगलेली असतात. अस्सल मातीतला रांगडा खेळ म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. पण आता याच शर्यतीमध्ये बाजी मारायची असेल तर अगोदर ही नियमावली वाचावी लागेल. तरच तुम्ही बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेता येणार आहे.

काय आहे नियमावली ?

कानाला बिल्ला नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही. टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ईअर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्री ही करता येणार नाही. १ जून पासून एअर टॅग बंधनकारक असल्याचे शासनाने परिपत्रक काढण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने 'नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन' ही भारत पशुधन प्रणाली आणली आहे. या प्रणालीनुसार जनावराच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो. त्यात एक १२ अंकी बारकोड असतो. यामध्ये पशुची जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यात येते. हा टॅग असेल तरच बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होता येणार आहे. या इअर टॅगवरुन रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरणाची नोंद ठेवण्यात येते. पशुधनाचे प्रजनन, त्याचा मालक, जन्म-मृत्यू, आजार, त्यावर केलेले उपचार आदींची माहिती ठेवण्यात येते. म्हणजे संबंधित पशूबाबतची सर्व माहिती जमा करण्यात येते.