Sangli Samachar

The Janshakti News

किती हा आत्मविश्वास ? नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण आणि तारीखही ठरली !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० मे २०२४
लोकसभा निवडणूक-२०२४ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे तर संध्याकाळपर्यंत नव्या सरकारचे चित्रही स्पष्ट होणार आहे. या सगळ्या गदारोळात एनडीएकडून सरकार स्थापनेची तयारी सुरु करण्यात आली आहे.हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एनडीए निवडणुक जिंकून पुन्हा सत्तेत आल्यास पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा कर्तव्यपथावर आयोजित केला जाणार आहे.हा सोहळा ९ जूनला पार पडणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.विशेष म्हणजे या सोहळ्याची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही याचे संकेत दिले आहेत.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जर निवडणुकीचा निकाल एनडीएच्या बाजूने लागला तर ९ जून रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन लोकांनी याची पुष्टी केली आहे. या संभाव्य सोहळ्यासाठी तात्पुरता आराखडा गेल्या महिन्यात तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.यापूर्वी दोन्ही प्रसंगी (२०१४-२०१९) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता.मात्र, भाजपाला यावेळी कर्तव्यपथावर हा सोहळा आयोजित करायचा आहे.या संदर्भात २४ मे रोजी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाची बैठकही झाली होती. या महत्त्वाच्या बैठकीत आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शपथविधी सोहळ्याच्या कव्हरेजबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यापूर्वी याचे संकेत दिले आहेत. वास्तविक, १० जून हा त्यांच्या पक्षाचा स्थापना दिवस आहे. परंतु, शपथविधी समारंभात व्यस्त असल्याने यावेळी पक्षाचा स्थापना दिवस साजरा करणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांना सांगितले होते.त्यामुळे ९ जूनला पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएने विजय मिळवला, तर शपथविधी समारंभ कर्तव्यपथावर आयोजित करण्याची योजना आहे. आता प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सोहळ्यासाठी कर्तव्य पथ (पूर्वीचा राजपथ) ही पहिली पसंती का? यावेळी सूत्रांनी सांगितले की, एनडीए अशा जागेचा शोध घेत आहे जिथे जास्तीत जास्त लोक या सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकतील आणि त्याचवेळी विकसित भारताचे चित्रही देशातील आणि जगाच्या लोकांना पाहता येईल. 'कर्तव्य पथ हा महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे'. या प्रकल्पाचे बांधकामही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे, त्यामुळे येथे शपथविधी सोहळा आयोजित केल्यास विकसित भारताची झलक लोकांना पाहता येणार आहे.