Sangli Samachar

The Janshakti News

मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 8 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही अनेकजण जण अडकले !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ मे २०२४
मुंबईतील वादळामुळे घाटकोपरच्या पूर्व दुगती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ६७ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना, या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी लगेच मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. तसेच बचावकार्य सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपाचराकरिता दाखल करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


पुढे बोलताना मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आम्ही आयुक्तांना दिले आहेत. तसेच जे होर्डिंग अनाधिकृत आहेत, त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही सरकारने आयुक्तांना दिले आहेत, असे ते म्हणाले. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.

राज्यात गेल्या ४ दिवसांपासून अवकाळी

मुंबईत पावसाचा धुमाकूळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, आज वादळी वाऱ्यासह राजधानी मुंबई पावसाच्या तडाख्यात सापडल्याचे दिसून आले. काही वेळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, घाटकोपर येथील पेट्रोल पंपाववर महाकाय होर्डीग कोसळल्याने तब्बल ७० ते ८० चारचाकी गाड्या या बॅनरखाली अडकल्या आहेत.