Sangli Samachar

The Janshakti News

हिंजवडी येथील 37 आयटी कंपन्यांचे राज्याबाहेर स्थलांतर,ट्रॅफिक जॅमचे ग्रहण !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३१ मे २०२४
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी भागात जगातील सर्वश्रेष्ठ आयटी कंपन्या आहेत.हिंजवडी येथील आयटी कंपन्यामुळे अख्या पुण्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकास झाला आहे. तसेच या ठिकाणी भारतातील विविध भागातून अभियंते आपली कारकीर्द घडवण्यास येतात. मात्र, या आयटी पार्कला मागील काही वर्षांपासून ट्रॅफिक जॅमचे ग्रहण लागले असून या समस्येमुळे येथील अनेक आयटी कंपन्यांनी त्यांचा उद्योग महाराष्ट्राबाहेर स्थलांतर केल्याची धक्कादायक बातमी समोर(Hinjawadi) आली आहे.

तब्बल 37 कंपन्या राज्याबाहेर गेल्या असून आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर जाऊन आपला उद्योग वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत.

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मेट्रोची कामे सुरू असल्याने त्यात आणखी भर पडली आहे. पुण्यात हिंजवडी येथे कंपनीत जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले अनेक कर्मचारी आपल्या कामकाजासाठी वेळेवर कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. अनेक आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम मागील काही महिन्यांपासून देखील बंद केल्यामुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.


हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसीस,विप्रो,टीसीयस,महिंद्रा,आयबीएम अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने राज्यभरातील तसेच देशभरातील लोक काम करतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्याने कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर वाहतूक कोंडीची समस्या अजून गंभीर होते. याच वाहतूक कोंडीला वैतागून 37 कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत झाल्या असून आणखी काही कंपन्या या बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन कडून प्राप्त(Hinjawadi) झाली आहे.

हिंजवडीत परिसरात 1 ते 1.5 लाख अधिक कार आणि इतर वाहने धावतात. या गाड्या वाहतूक कोंडीत अडकतात. या ठिकाणी तब्बल 150 कंपन्या असून 5 ते 7 लाख कर्मचारी लोक काम करतात. मात्र, 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याने ऑफिसपेक्षा वर्क फ्रॉम होम बरे अशी काम करणाऱ्यांची अवस्था झाली आहे.हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक व भूमकर चौक हाच मार्ग असून येथे मेट्रोची कामे देखील सुरू आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. मात्र, त्याला प्रचंड प्रमाणात वेळ लागणार आहे.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथील कंपन्यांचे स्थित्यंतरबद्दल शिवसेना(उबाठा)चे नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी या प्रकरणी पक्षाच्या अधिकृत सोशल मिडिया x(पूर्वीचे ट्विटर) वर ट्विट केले आहे. घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून बसले आहे. महाराष्ट्रातील तरुणांचे भविष्य दावणीला बांधून हे सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे,असे ट्विटमध्ये म्हटले आहे.