Sangli Samachar

The Janshakti News

कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...| सांगली समाचार वृत्त |
श्रीनगर - दि. १४ मे २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. विशेष म्हणजे, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या पहिल्याच निवडणुकांबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. 2024 मध्ये पहिल्यांदाच तीन दशकांहून अधिक काळापासून दहशतवादाने त्रस्त असलेल्या श्रीनगरमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान झाले.

केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली राज्यातून कलम 370 हद्दपार केले होते. यासोबतच जम्मू-काश्मीर आणि लडाख, या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. त्यनंतर पहिल्यांदाच येथे निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर भागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 35.75% मतदान झाले. हा गेल्या पंचवीस वर्षातील सर्वोच्च आकडा आहे.

रेकॉर्डब्रेक मतदान

यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथे 14.1 टक्के, 2014 मध्ये 25.9 टक्के, 2009 मध्ये 25.06 टक्के, 2004 मध्ये 18.06 टक्के आणि 1999 मध्ये 11.9 टक्के मतदान झाले होते. त्याआधी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त भागात अनेकवेळा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. म्हणजेच यंदाच्या निवडणुकीत या भागात सर्वाधिक मतदान झाले आहे. दहशतवाद्यांची भीती नसल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान केले.


यावेळी श्रीनगर जागेसाठी 24 उमेदवार असून, मतदारसंघात एकूण 17.48 लाख मतदार आहेत. लडाख वेगळा झाल्यानंतर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या पाच जागा आहेत. यात - बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनाग-राजौरी, उधमपूर आणि जम्मू. अनंतनाग-राजौरीमध्ये 7 मे रोजी निवडणुका होत्या, पण त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता 25 मे रोजी येथे निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, काश्मीरमध्ये दहशतवादाचे युग सुरू झाल्यानंतर, म्हणजे गेल्या 35 वर्षांत पहिल्यांदाच कोणत्याही संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलेली नाही.