Sangli Samachar

The Janshakti News

शेतात कॅमेरा लावला.. बिबट्या रुबाबात दिसला.. वन विभागाला कळवलं.. उत्तर आलं..शासन 25 लाख रुपयांची मदत देते की!



| सांगली समाचार वृत्त |
दौंड - दि. २६ मे २०२४
दौंड तालुक्यातील पाटस येथे आठ दिवसापूर्वी गोलांडीमळा येथील दत्तू कोकरे यांच्या मेंढपाळाच्या कापावर बिबट्याने भरदिवसा हल्ला करून एका शेळीला फस्त केलं तर या हल्ल्यात एक शेळी जखमी झाली. मेंढपाळाच्या डोळ्यादेखत शेतकरी मोहित काळे यांच्या शेतात ही थरारक घटना घडली. 

या घटनेनंतर वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल तालुका वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे पाठवला. या हल्ल्यानंतरही बिबट्याने मोहित काळे यांचा उसाचा फड सोडला नाही. बिबट्या त्याच ठिकाणी ठाण मांडून आहे. शेतकरी मोहित काळे त्यांना हा बिबट्या दिसल्याने त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून याची कल्पना दिली. 

मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या गेला असेल, तो एका जागेवर थांबत नाही अशी उत्तरे देत टाळाटाळ केली. मोहित काळे यांच्या पाठपुराव्यामुळे वन विभागाने त्या ठिकाणी कॅमेरे बसवला आणि चक्क एक बिबट्या रात्रीच्या सुमारास उसाच्या शेतात रुबाबात ऐटीत फिरताना कॅमेरात कैद झाला. बिबट्याच्या भितीमुळे या परिसरात शेतकरी, मजूर आणि महिला काम करण्यास घाबरत आहेत.


आठ दिवसापासून त्या भागात शेतकरी शेतात फिरकत नाहीत. या भितीमुळे शेतकरी मोहित काळे यांनी थेट तालुका वनपरिक्षत्र कार्यालय गाठले आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्र देऊन पिंजरा बसण्याची विनंती केली. काळे यांच्या सांगण्यानुसार तिथं उपस्थित असलेल्या वन अधिकाऱ्यानं आम्हाला पिंजरा बसवता येत नाही. त्यासाठी नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी लागते आणि बिबट्याच्या हल्ल्यात माणूस मेला तर पिंजरा लावायला परवानगी मिळते आणि मग आपल्याला प्रशासन दोन अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत करते असा अजब सल्ला आणि मार्गदर्शन ऐकवले. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं उत्तर देणे अपेक्षितच नाही. मुळात या ठिकाणी पिंजरा लावण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. ती जबाबदारी शेतकऱ्यांची नाही. त्यासाठी पाठपुरावा करण्याची वन विभागाची जबाबदारी नव्हे, नैतिक कर्तव्य आहे असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी किंवा कोणीही कर्मचाऱ्याने अशी उत्तर दिलेली नाहीत. बिबट्या आढळल्यासंदर्भात नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयाकडे या संदर्भात आम्ही अहवाल पाठवला आहे. वनविभाग पूर्णपणे या संदर्भात जनजागृती आणि दक्षता घेत आहे. शेतकऱ्यांनी वन विभागाला सहकार्य करावे. आमचे सहकार्य आहे. 

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी केवळ जनजागृती करणे यावर भर देत आहेत आणि बिबट्याच्या हल्ल्यात माणूस मारण्याची वाट बघत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दौंड तालुक्यात बिबट्याने अक्षरक्ष: दहशत माजवली आहे. राहु बेटासह पुणे सोलापूर महामार्ग लगतच्या गावात आणि पूर्व भागातही बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना बिबट्याने आपले शिकार बनवले आहे. अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात दगावली आहेत. आता फक्त माणसावर हल्ला होऊन माणूस मरण्याची वाट बघत बसायची का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.