Sangli Samachar

The Janshakti News

2 सिम कार्ड असलेल्यांची चिंता वाढणार !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ मे २०२४
भारत हे टेलिकॉम कंपन्यांसाठी एक मोठे मार्केट आहे. कारण, भारतातील बहुतेक नागरिकांकडे मोबाईल फोन आहेत आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी अनेकजण हे दोन सिम कार्ड वापरतात. तुमच्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा दोन सिम कार्ड आहेत का? तुम्ही जर दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला आता खिसा जास्त रिकामा करावा लागणार आहे. कारण टेलिकॉम कंपन्यांकडून टेरिफ प्लानच्या किमतीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच ही दरवाढ लागू केली जाण्याची शक्यता आहे. याआधी टेलिकॉम कंपन्यांकडून डिसेंबर 2021 मध्ये टेरिफ प्लानच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता बराच काळ झाला दरवाढ झालेली नाहीये. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्या खासकरुन जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यासारख्या कंपन्या आपल्या टेरिफ प्लानच्या दरात वाढ करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांच्या डोक्याला ताप होणार आहे. म्हणजेच त्यांना आता दोन्ही सिम कार्ड रिचार्ज करण्यासाठी किंवा दोन्ही सिम कार्डचे बिल भरण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल यासारख्या कंपन्या येत्या काही दिवसांत आपल्या टेरिफ प्लानमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल यासारख्या टेलिकॉम कंपन्याचे सिम चालू ठेवण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 150 रुपयांच्या रिचार्ज करावे लागते. पण दरवाढ लागू झाल्यावर 150 रुपयांच्या ऐवजी 180 ते 200 रुपयांचा रिचार्ज करावे लागले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे दोन सिम कार्ड आहेत तर तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी महिन्याला जवळपास 400 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.


रिलायन्स जिओ, एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांकडून लवकरच 5जी रिचार्ज प्लान वेगळे लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक 5 जी आणि एक 4 जी सिम कार्ड असेल तर तुम्हाला महिन्याचा रिचार्ज खर्च हा जवळपास 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच 5 जी सिम कार्डचे रिचार्ज प्लान हे 4जी च्या तुलनेत अधिक असणार आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून टेरिफ प्लानच्या संदर्भातील वाढ कधी लागू करण्यात येणार आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. मात्र, लवकरच हे दर लागू होण्याची शक्यता आहे.