| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० एप्रिल २०२४
सांगलीचे तपमान ४१ अंशावर पोहचल्याने निवडणूक प्रचाराबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. उन्हाच्या त्रासामुळे दुपारी बारानंतर बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत असून निवडणुक प्रचारालाही गतीरोधक लागत आहे. गेल्या दोन दिवसापासून तपमान सातत्याने वाढत असून सोमवारी तापमापकामध्ये ४० अंश तपमान नोंदले गेले असले तरी प्रत्यक्षात ४१ अंश तपमान भासत आहे. आज हवेतील आर्द्रता २९ टक्के असून अंशत: ढगाळ हवामान होते. दुपारी चार वाजता सर्वाधिक म्हणजे ४० सेल्सियस तपमान नोंदले गेले. सायंकाळी सहा वाजता केवळ दोन अशांने तपमान कमी झाले असले तरी हवेतील उकाडा कायम होता. डांबरी रस्ते, सिंमेंटच्या इमारती तापल्यामुळे ही उष्णता अधिकच भासत होती. यामुळे बाजारात दुकाने दुपारनंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंदच होती.
वाढत्या उन्हाच्या झळांचा निवडणूक प्रचारावर आणि शेती कामावर परिणाम झाला आहे. प्रचारासाठी घराबाहेर पडलेले कार्यकर्ते दुपारच्या रखात रस्त्याकडेला झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसत होते. तसेच शेतीकामाच्या वेळाही बदलल्या असून सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सात अशा वेळा मजुरांनी निश्चित केल्या असून जिरायतीमधील कामे संपली असली तरी द्राक्ष बागामध्ये एप्रिल छाटणीनंतरची विरळणीची कामे सध्या सुरू आहेत. ही कामेदोन टप्प्यात केली जात आहेत.