Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवार अडचणीत, 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार| सांगली समाचार वृत्त |
इंदापूर - दि.२१ एप्रिल २०२४
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्याने जसे प्रसिद्ध आहेत, तसेच ते अशा बेधडक वक्तव्यामुळे अडचणी येत असतात हेही सर्वश्रूत आहे. नुकतेच त्याने इंदापूर येथे असे काही वक्तव्य केले की त्यामुळे ते नव्याने अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल", असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना इंदापूर येथे केले होते. आता राज्य निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने चौकशीचे हे आदेश दिले.


दरम्यान, अजित पवार आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणे देताना म्हणाले की, मी इंदापूरमध्ये बोललो. ते ग्रामीण भाषेत बोललो, तेच पुण्यात असतो, तर तिथे कचा-कचा नाही चालत. ज्या भाषेत चालते तसेच बोलावे लागते, चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. जे ठरेल तसा महायुती धर्म आपण पाळू.

अजित पवार पुढे म्हणाले, इंदापूरमध्ये संयुक्त सभा असतील, त्याला मी उपस्थित राहीन, मागचे खूप साचले आहे. इतर पक्ष वेगळे पण भाजप हा शिस्तीचा पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात आलबेल आहे.

अजित पवार म्हणाले, ज्यांच्याकडून निधी घ्यायचा त्यांच्यावर टीका करता, कसे ते पैसे देतील. भूमिपूजन त्यांनीच केले उद्घाटन देखील त्यांनीच केले, असा नेता असावा लागतो. नाहीतर काही राजकारणी असतात, निवडणूक आली की नारळ फोडतात, परत पुढची निवडणूक आली की नारळ फोडतात. मोदीनी महिलांना आरक्षण दिले. मोदी परत निवडून आले तर संविधान बदलतील असे सांगितले जाते, काहीही थापा मारतात.