सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
सांगली - परवा मुंबईत महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार बैठकीत सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्याबाबत निर्णय झाला. यावरून कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत, यावरून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बोर्ड वरील काँग्रेस शब्दावर पांढरा रंग लावण्यात आला. जतच्या काही कार्यकर्त्यांनी तर रक्ताने पत्र लिहिले. यावरून कार्यकर्त्यांचा रोष लक्षात येतो. परंतु कार्यकर्त्यांनी कोणताही आतताई निर्णय न घेता संयमी भूमिका घ्यावी अशी भावनिक साद विशाल दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली.
स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड वरील काँग्रेस या शब्दावर काही संतप्त कार्यकर्त्यांनी पांढरा रंग लावलेला होता. आज स्वतः विशाल दादा पाटील हे काँग्रेस कमिटीत उपस्थित राहून या ठिकाणी नवीन बोर्ड लावला.
या वेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो. परंतु कार्यकर्त्यांनी आपला राग आमच्यावर काढावा, काँग्रेस पक्षावर नको. कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडलो असू, वैयक्तिक मी कुठेतरी कमी पडले असेन यामुळे हे सारे घडले. परंतु देश पातळीवरील राजकारण करीत असताना, काही कटू निर्णय घ्यावे लागतात. सांगलीच्या जागेबाबत अजूनही आम्ही सकारात्मक आहोत. तेव्हा कार्यकर्त्यांनी श्रद्धा व सबुरी ठेवून पक्षावरील निष्ठा ढळू देऊ नये असे आवाहन विशाल दादा पाटील यांनी केले.