Sangli Samachar

The Janshakti News

अशी निवडणूक... अशा घोषणा !...सांगली समाचार - दि. ३ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - कॉग्रेसचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने दहा वर्षांचा कालावधी पार केला होता. आघाडी सरकार असल्याने विविध मुद्द्यांवर घटक पक्षांना चुचकारत, कसरत करत मनमोहनसिंग यांची कारकीर्द पार पडली होती. अणुकरार, टूजी स्पेक्ट्रम गैरव्यवहार, कोळसा खाण गैरव्यवहार आदींच्या आरोपांनी सरकारला घेरले गेले होते. त्यातच २०१४ ची लोकसभा निवडणूक लागली होती. भाजपला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने संजीवनी प्राप्त झाली होती. त्यांनी या निवडणुकीत 'अबकी बार मोदी सरकार' व 'अच्छे दिन आऐंगे' हे दोन नारे या निवडणूक प्रचारात दिले.

या आधीच्या निवडणुकीत भाजपने 'सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटलबिहारी' ही व्यक्तिगत महत्वाकांक्षा समोर ठेवणारी घोषणा दिली होती. नंतर २०१४ च्या निवडणुकीत मात्र पुन्हा भाजपने देशातील मुद्द्यांना प्राधान्य देण्यापेक्षा लालकृष्ण अडवानी व वाजपेयी या ज्येष्ठ नेत्यांना दूर सारत व गुजरात मॉडेल व नरेंद्र मोदींचे नवनेतृत्व स्वीकारले. पुन्हा 'अब की बार, मोदी सरकार' ही व्यक्तीकेंद्री घोषणा दिली.


या घोषणेला अर्थातच 'अच्छे दिन'चीही साथ होती. या दोन्ही घोषणांचे आकर्षण मतदारांत निर्माण होऊन भाजपने ही निवडणूक जिंकली. भाजपला तब्बल २८२ जागा तर त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला एकत्र ३३६ जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळून आजवरचा लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भाजपला सात राज्यांत शंभर टक्के जागा मिळाल्या तर उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ व पंजाबमध्ये १० पैकी ९ एवढ्या जागा मिळाल्या. भारतात घोषणांचे महत्त्व खऱ्या अर्थाने भाजपने व त्यातही नरेंद्र मोदी यांनी जाणल्याचे या निवडणूक प्रचाराकडे पाहिल्यावर लक्षात येऊ शकेल.