Sangli Samachar

The Janshakti News

एमडी ड्रग्ज साठा प्रकरण सांगली पोलिसांना भोवणार ?| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२४ एप्रिल २०२४
सांगली जिल्ह्यातील कुपवाड व इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे छापेमारी करून 545 कोटी किमतीच्या 262 किलो एमडी ड्रग्ज साठ्याचा पुणे पोलिस व मुंबई क्राईम ब्रँचने छडा लावला. स्थानिक तरुणांसह परप्रांतीय ड्रग्ज तस्करांना जिल्ह्याबाहेरील पथकांनी बेड्या ठोकल्याने स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेची गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संबंधित पोलिस ठाण्यांतर्गत यंत्रणांच्या सखोल चौकशीचे सांगली पोलिस अधीक्षकांना आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व कुपवाड पोलिस ठाण्यांतर्गत हद्दीत 22 फेब्रुवारी ते 25 मार्च 2024 या 34 दिवसांत पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण व मुंबई क्राईम ब्रँचच्या वतीने स्वतंत्र छापेमारी करून कोट्यवधी रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज साठा हस्तगत केला आहे. वास्तविक स्थानिक पोलिस यंत्रणांना ड्रग्ज तस्करांच्या हालचालीची माहिती असणे स्वाभाविक होते.

इरळी व कुपवाड येथील घटनांमध्ये प्रथमदर्शनी प्रभारी अधिकार्‍यांसह पोलिस पथक व गोपनीय यंत्रणांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे, असे स्पष्ट करीत कोल्हापूर परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रभारी अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

ड्रग्जसाठा प्रकरणी झालेला हलगर्जीपणा गंभीर स्वरूपाचा आहे. याबाबत सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित प्रभारी अधिकार्‍यांसह संबंधित घटकांची चौकशी सुरू केली आहे. अहवाल उपलब्ध होताच दोषीवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही फुलारी यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. समाजविघातक कृत्याविरुद्ध कठोर कारवाईचे आदेशही परिक्षेत्रांतर्गत पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागालगत असलेल्या कोल्हापूर, सांगलीसह सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ड्रग्जसह गुटखा आणि बनावट दारूच्या तस्करीची शक्यता नाकारता येत नाही. या कृत्यांना रोखण्यासाठी सीमाभागासह महामार्गावर 36 ठिकाणी रात्रंदिवस गस्ती पथके नियुक्त करण्यात आली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा पोलिसांची संयुक्त पथकेही तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.