Sangli Samachar

The Janshakti News

समाजवादी पार्टी मविआसोबत असल्याने राज्यातील एकगठ्ठा मुस्लिम मतं महा आघाडीला तारणार ?



सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
मुंबई  - शिवसेनेत उभी फूट पडली, चिन्ह गेले असले तरी शिवसेनेची वोट बँक कायम असून यावेळी मुस्लिम मतंही मविआला मिळणार आहेत. राज्यात मुस्लिम मतं १ कोटी ३० लाखाच्या आसपास म्हणजे ११ ते १२ % टक्के इतकी असून ही मतं कर्नाटकप्रमाणे निवडणूक निकालासाठी निर्णायक ठरणार आहेत. त्याशिवाय समाजवादी पार्टी यावेळी मविआ आघाडीसोबत खंबीरपणे उभी असल्याने ही मुस्लिम मतं राज्यातील ४८ च्या ४८ लोकसभा मतदारसंघात भाजप व भाजपा महायुतीच्या विरोधात जाणार हे निश्चित आहे. मतं विभाजनासाठी किती ही 'बी टीम' उतरविल्या तरी यश मिळणार नाही, हे भाजपला माहित असून ही संघ व भाजपची खरी चिंता आहे. त्यासाठीच राज्यातील महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपने आपल्या 'बी टीम'च्या माध्यमातून केला. ही फूट पडली असती तर किमान दलित अन् मुस्लिम मतं बऱ्यापैकी विभागली असती. पण ते शक्य झाले नाही.


देशात झालेल्या इंडिया आघाडीनंतर राज्यातील महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली. त्याशिवाय महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे त्यांनी आपल्या परंपरागत वोट बँकेसोबत मुस्लिम समाजाला सोबत येण्यास भाग पाडले आहे. दलित व मुस्लिम एकगठ्ठा मतं मविआलाच विजयी करणार यात शंका नाही. मे 2023 मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने हे दाखवून दिले आहे. अन् याचाच धसका महाराष्ट्रात भाजपने घेतला आहे. तर या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी संघ व भाजप ज्या 'बी टीम'चा वापर करीत आलेला आहे. त्या टीमची आता विश्वासाहर्ता उरलेली नाही. त्यामुळे हा धसका अधिक चिंता वाढविणारा ठरत आहे.

निवडणुका लढणे हा राजकीय पक्षांचा अधिकार आहे. तो अधिकार वंचित आघाडीला आहे. पण देशाचे संविधान धोक्यात असताना 'एकला चलो रे' चा फॉर्म्युला केवळ भाजपला मदत करणारा ठरणार आहे. वंचितला एका ही जागी याचा फायदा होणार नाही. मग हा आत्मघाती निर्णय का ? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला असून याचे समाधानकारक उत्तर वंचितकडे नाही.

२०१९ मध्ये अशीच भूमिका वंचितने घेतल्याने भाजप युतीचा १२ जागांवर फायदा झाला होता, हे उघड सत्य असताना काँग्रेस - राष्ट्रवादी काँगेसमुळे वंचितचे ८ उमेदवार पडले, असा खोटा प्रचार वंचितने सुरु केला आहे. विजयी उमेदवार व वंचित उमेदवाराला मिळालेला मतांमधील फरक हा ४ ते ५ लाखाचा असताना असा खोटा प्रचार करुन वंचित कुणाची अन् का फसवणूक करीत आहे ? फसवणूक करण्या मागचा हेतू काय आहे ? असा प्रचार करुन नेमकी कुणाची फसवणूक व कुणाच्या फायदा होणार आहे ? असे सारे प्रश्न यावेळी उभे राहत असून या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल दिली जात आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील ज्या मतदारसंघात निवडणूक होत आहेत, त्या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असिम आझमी यांनी नुकताच दौरा केला असून या दौऱ्याच्या वेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व जाहीर सभांमधून संविधान, लोकशाहीविरोधी व देशद्रोही भाजपला सत्तेवर जाण्यापासून रोखण्याचे आव्हान मा. अबू असिम आझमी यांनी केले व त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या दौऱ्यानंतर विदर्भातील समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून ते इंडिया/ मविआ आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारत उतरले आहेत. तसेच राज्यातील दलित अन् मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणावर उद्धव सेनेकडे वळली असल्याने भाजप अधिक चिंताग्रस्त आहे. सपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अन् शिवसेनेची परंपरागत मतं भाजपचा सपाटून पराभव करु शकतात, हे माहित असल्याने वंचितने सेनेसोबत युती करुन मविआमध्ये फूट पाडवी, असा प्रयत्न भाजपचा होता. पण सेना नेत्यांनी त्यास भीक घातली नाही. असाच प्रयोग वंचितने काँग्रेससोबत युतीच्या माध्यमातून केला. पण डाळ सशजली नाही. अन् सर्व खटाटोप करुन थकल्यावर एकला चलो ची भूमिका घेऊन भाजपलाच साथ देण्याचे वंचितने ठरविले....!